मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  File Photo
मुंबई

पालकमंत्री नियुक्तीत शिवसेना मंत्र्यांना डावलल्याने शिंदे नाराज

दरे गावी रवाना; महायुतीत नव्या वादाची ठिणगी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांमध्ये शिवसेना मंत्र्यांना डावलण्यात आल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या नाराजीतून कोणालाही न सांगता ते सातारा जिल्ह्यातील दरे या आपल्या मूळ गावी निघून गेले आहेत. त्यामुळे पालकमंत्रिपदाच्या नियुक्त्यांवरून महायुतीत वाद रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पालकमंत्रिपदाच्या यादीमध्ये शिवसेनेचे मंत्री दादा भुसे, भरत गोगावले आणि राज्यमंत्री योगेश कदम यांना स्थान देण्यात आले नाही. या तिघांनाही पालकमंत्रिपद मिळावे, असा एकनाथ शिंदे यांचा आग्रह होता. तो आग्रह डावलून पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. त्यामुळे एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या पार्श्वभूमीवर ते आपले कार्यक्रम रद्द करून रविवारी सकाळीच दरेला निघून गेल्याची माहिती संध्याकाळी पुढे समोर आली. मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने शिंदे याआधी नाराज होते. त्यांच्या नाराजीमुळे सत्तास्थापना आणि खातेवाटप रखडले होते. मात्र त्यांना नगरविकास आणि गृहनिर्माण ही दोन महत्त्वाची खाती देऊन भाजपने तडजोड केली. आता पालकमंत्रिपदापासून शिवसेनेच्या तीन मंत्र्यांना दूर ठेवल्याने महायुतीत धुसफूस सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT