मुंबई : सत्तर वर्षांच्या आजारी आजीला कांदिवली येथून रिक्षातून आणून आरे येथे कचर्यात टाकून पळून गेलेल्या नातवासह तिघांना आरे पोलिसांनी अटक केली आहे. सागर शेवाळे या नातवासह बाळासाहेब गायकवाड आणि संजय कुशदीम ऊर्फ बॉबी अशी या तिघांची नावे आहेत. अटकेनंतर या तिघांनाही नोटीस देऊन सोडून दिल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी सांगितले.
यशोदा गायकवाड ही 70 वर्षांची वयोवृद्ध महिला नातू सागर याच्या कांदिवलीतील पोईसर येथील घरी राहात होती. यशोदा या गेल्या काही वर्षांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर औषधोपचारही सुरू होते. मात्र, त्यातून त्यांना काहीच फरक जाणवत नव्हता. शनिवारी आरे परिसरातील दर्गा रस्ता परिसरात त्या कचर्याच्या ढिगार्याखाली पडल्या होत्या.
आरे पोलिसांना घटनास्थळी जात आजीला तातडीने कूपर रुग्णालयात दाखल करीत पुढील तपास सुरू केला होता. नातेवाइकांचा शोध सुरू केला होता. यानंतर सागर हा स्वत:हून पोलीस ठाण्यात येत शनिवारी यशोदा या घरातून निघून गेल्याचे सांगितले. त्याच्या जबानीत विसंगती दिसून आल्याने पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. त्यात सागरनेच त्याच्या आजीला तिथे टाकून पलायन केल्याचे उघडकीस आले.