कांदिवली : लग्नासाठी मुलींच्या विक्रीच्या घटनांत वाढ झाली आहे. वाडा व शहापूर तालुक्यातील दोन अल्पवयीन मुलींबाबत हा प्रकार नुकताच घडला असून आता कांदिवलीतील एका 22 वर्षीय मुलीबाबतही असाच प्रयत्न समोर आला आहे.
घरच्यांकडून लग्नासाठी जबरदस्ती होत असल्याने आधार म्हणून पुण्यात चुलत आजीकडे तरुणी राहण्यास गेली. मात्र तिनेही संभाजीनगर येथील एका तरुणाबरोबर चार लाख रुपयांसाठी तिचे लग्न लावून देण्याचा प्रयत्न केला. वेळीच तरुणीने तेथून पळ काढल्याने हा प्रयत्न फसला आहे. तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारनंतर समतानगर पोलिसांनी आजी मेनका सिंग आणि काका यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी सुरू केली आहे.
पायल ( नाव बललेले आहे) कांदिवली आपल्या कुटुंबासह राहत होती. गेल्या वर्षी ती बारावीच्या परीक्षेत नापास झाली. म्हणून आई-वडिलांनी तिच्या लग्नासाठी एक स्थळ शोधले. मुलगा तिच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठा असल्याने पायलने या लग्नास नकार देत ती पुण्यात राहत असलेल्या आजी मेनका सिंग हिच्याकडे राहण्यास गेली. पायल जाताना घरातून सोन्याचे दागिने आणि पैसे घेऊन आजीकडे गेली होती. काही दिवसांनी आजीनेे तिच्याकडील दागिने आणि पैसे घेऊन तिला मारहाण सुरू केली. तिला घेऊन संभाजीनगर येथे जात एका अनोळखी तरुणाबरोबर ओळख करून दिली. त्या तरुणाने तिच्याबरोबर लग्न करण्यास होकार दिला. या बदल्यात आजी मेनका सिंग आणि काका यांनी त्या मुलाकडे चार लाख रुपयांची मागणी केली होती.
हा सर्व प्रकार पायलला समजताच तिने संभाजीनगरमधून पळ काढत परभणी गाठली. परभणीत एका अनोळखी कुटुंबाने तिला सहारा दिला. तेथून घडलेला हा सर्व प्रकार पायलने आपल्या आई-वडिलांना सांगितला. वडिलांनी तिला परभणीतून मुंबईत घेवून जात पोलिसांत तक्रार दिली आहे. वाडा तालुक्यातील परळी गावातील एका अल्पवयीन मुलीचे अवघ्या चौदाव्या वर्षी संगमनेर येथील एका तरुणांसोबत जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आले होते.तर शहापूर तालुक्यातील किन्हवली भागात पन्नास हजारांसाठी अल्पवयीन मुलीची पारनेर तालुक्यातील एका तरुणाशी लग्नगाठ बांधली जाणार होती.