मुंबई : अमेरिकेतील टेक्सास राज्यातील डॅलस शहरात मागचे तीन-चार महिने एक वेगळीच लगबग सुरू आहे. विविध अभिनव उपक्रमांची अत्यंत कल्पकतेने आखणी करून मोठ्या धर्तीवर ते कार्यक्रम यशस्वीरित्या राबवायचे, ही टेक्सासमधील डॅलस फोर्टवर्थ महाराष्ट्र मंडळाची खासियतच..
यावर्षी या परंपरेमध्ये आणखी भर पडली. यावेळेस प्रथमच टेक्सासमधील विविध शहरांतील महाराष्ट्र मंडळातील बांधवांना एकत्र करून बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने भव्यदिव्य अशा मैत्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. १५०० हून अधिक रसिक या मैत्रीच्या उत्सवासाठी उपस्थिती नोंदवणार आहेत. आपल्या मंडळींना स्वतःच्या मंडळाच्या बाहेर पाहण्याची आणि इतर मंडळींशी विचारविनिमय, ओळख-पाळख वाढवण्याची संधी निर्माण करून, दोन दिवसांच्या भरगच्च कार्यक्रमात किमान खर्चात अधिकाधिक लोकांच्या सहभागाला वाव देणे हे या "मैत्री" मेळाव्याचे प्रमुख उद्दिष्ट्य.
येत्या १९ व २० एप्रिलला होणाऱ्या या मैत्री मेळाव्यात भारतातून 'जर तर ची गोष्ट' हे प्रिया बापट व उमेश कामत यांचे गाजलेले नाटक, देवकी पंडित यांच्या सुरेल गाण्याची मैफल तसेच ओमी वैद्य ( थ्री इडियटस फेम) यांची स्टँडअप कॉमेडी असे दर्जेदार कार्यक्रम होणार आहेत. याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित 'राजा शिवछत्रपती' हे एक भव्य दिव्य नाटक डॅलस मधील स्थानिक कलाकार सादर करणार आहेत. यामध्ये अत्यंत वेगळ्या पद्धतीने ऑडिओ/ व्हिडिओ शाहिरी आणि ओघवते कथाकथन असणार आहे. विशेष म्हणजे स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी लघुनाट्य व नृत्यकथा हे खास कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत.
'सर्वांसाठी सगळं ' या सूत्राला अनुसरून सर्व वयोगटासाठी व विविध कार्यक्रमांची रेलचेल असलेला हा आगळावेगळा मैत्री मेळावा रसिकांसाठी पर्वणीच ठरणार आहे. लहान मुलांपासून ते सीनियर सिटीझन्सपर्यंत सर्वांसाठी करमणुकीबरोबरच वैचारिक व समाज उपयोगी कार्यक्रमांची आखणी हे या मैत्री मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. मुलांच्या कार्यक्रमात टेक्सासमधील विविध मराठी शाळेतील मुले आपल्या कलागुणांचे सादरीकरण करतील. उत्तररंग या कार्यक्रमाचे आयोजन खास सीनियर्ससाठी करण्यात आले आहे. तसेच टेक्सासमधील मराठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी बिझनेस कनेक्ट हा कार्यक्रम असणार आहे. यासह मनपसंत जोडीदार मिळावा यासाठी बृहन्महाराष्ट्र मंडळाचा 'रेशीमगाठी' हा उपक्रमही या मेळाव्यात असणार आहे.
टेक्सासमधील डॉक्टर्स एकत्र येऊन त्यांचे नेटवर्किंग व्हावे व त्याचा उपयोग येथील नागरिकांना व्हावा, यासाठी फिजिशियन नेटवर्किंग हा एक आगळावेगळा कार्यक्रम असेल.विविध कार्यक्रमांबरोबरच विविध खाद्यपदार्थांची तिथे रेलचेल असणार आहे. प्रसिद्ध शेफ व 'विष्णुजी की रसोई'चे संस्थापक विष्णू मनोहरही ह्या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत.
'मैत्री' संकल्पनेवर आधारित 'टेक्सन-मराठी' संस्कृतीचा मिलाफ असणारा एक हटके कार्यक्रम म्हणजे 'क्लोजिंग सेरेमोनी'. दोन दिवसांच्या या भरगच्च मैत्री मेळाव्याची सांगता या कार्यक्रमाने होईल. डॅलस फोर्टवर्थ महाराष्ट्र मंडळाने आयोजित केलेला हा आगळावेगळा आणि भव्य मैत्री मेळावा साजरा करण्यासाठी डॅलस नगरी सज्ज झाली आहे. टेक्सासवासियांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून वेगवेगळ्या उपक्रमांचा व कार्यक्रमांचा लाभ आणि आस्वाद घ्यावा, अशी इच्छा डॅलस फोर्टवर्थ महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षा शामली असनारे आणि सचिव राहुल पाडळीकर यांनी व्यक्त केली आहे. यानिमित्त राज्यातील विविध शहरांतील मराठी बांधवांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे.