मुंबई : राज्य सरकारकडून गोविंदांना मिळणार्या विमा कवचात वाढ होणार आहे. यंदा 75 हजारांच्या जागी दीड लाख गोविंदांचा विमा उतरविला जाणार आहे. दहीहंडी समन्वय समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तशी मागणी केली असून मुख्यमंत्र्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
दहीहंडी समन्वय समितीने मंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. महाराष्ट्र सरकारने दहीहंडी या खेळाला साहसी दर्जा दिल्यापासून या खेळातील गोविंदांचा सहभाग वाढला आहे. त्याच बरोबर खेळात सहभागी होणार्या गोविंदांचा धोकाही वाढलेला आहे.
यासाठी राज्य सरकारने मागील दोन वर्षापासून 75 हजार गोविंदांसाठी विमा कवच देण्याचा निर्णय घेतला. तरी या वर्षी यामध्ये वाढ करुन दीड लाख गोविंदांना विमा कवच मिळावे अशी मागणी करीत शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी क्रीडा विभागाला याबाबत कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकृष्ण पडेलकर, गीता झगडे आणि पदाधिकारी सहभागी झाले होते.