मुंबई : मुंबईतील राज्य सरकारच्या विविध शासकीय कार्यालयांनी मुंबई महापालिकेचा सुमारे 1800 कोटी 33 लाखांचा मालमत्ता कर थकवला आहे. यामुळे महापालिकेच्या महसुलांवर परिणाम होत असून थकबाकी भरण्यासाठी सरकारी यंत्रणा दाद देत नसल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले.
आधीच आर्थिक डबघाईला आलेल्या मुंबई महापालिकेला जमा असलेल्या एफडी मोडून विकासकामे करावी लागत आहेत. दुसरीकडे त्यांच्या हक्काचा असलेला मालमत्ता कर वसूल करण्यासाठी राज्य सरकारच्या विविध प्राधिकरण आणि यंत्रणांकडे पाठपुरावा करावा लागत आहे.
महापालिकेच्या करनिर्धारण विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, एमएमआरडीएने 929 कोटी 79 लाख 76 हजार 852 रुपये, म्हाडा प्रशासनाने 368 कोटी 55 लाख 89 हजार 967 रुपये, मुंबई पोलीस विभाग 71 कोटी 43 लाख 42 हजार 662 रुपये, राज्य सरकारी कार्यालये 221 कोटी 85 लाख 78 हजार 017 रुपये, तर केंद्र सरकारची कार्यालये 208 कोटी 68 लाख 76 हजार 602 रुपये अशाप्रकारे या सर्व शासकीय कार्यालयांनी महापालिका मालमत्ता कर थकविलेला आहे.
एमएमआरडीएने थकविला सर्वाधिक कर
मुंबई शहरात विकासाचे मोठ्या प्रमाणात प्रकल्प उभारणारी एमएमआरडीए प्राधिकरणाने मुंबई महापालिकेचे सुमारे 929 कोटी 79 लाख 76 हजार 852 रुपये मालमत्ता कर थकविला आहे, तर दंडाची रक्कम ही 689 कोटी 96 लाख 42 हजार 511 इतकी आहे.