Satej Patil |  
मुंबई

Satej Patil | ‘गोकुळ’वर कब्जासाठी सरकारचे षड्‌यंत्र

सतेज पाटील यांचा आरोप; ९ नोव्हेंबरला दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : ‘गोकुळ’च्या निवडणुकीत आम्हाला २५ पैकी १३ जागा मिळाल्या, बहुमत मिळाले. निकाल महायुतीच्या हातातून गेला म्हणून सरकारने कायदा बदलला. ५०० कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या संस्थांवर कब्जा मिळविण्यासाठी ५ शासकीय सदस्य बेकायदेशीररीत्या नेमण्याचा निर्णय केला. शेतकऱ्यांचा कौल नाकारण्याचा प्रकार असून, हा कोल्हापूरच्या जनतेचा अपमान आहे. त्यामुळे आम्ही कोल्हापूरकर रस्त्यावर उतरून संघर्ष करणार आहोत. सोमवार, ९ नोव्हेंबरला दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर संघर्ष मोर्चा काढण्यात येईल, अशी घोषणा विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ. सतेज पाटील यांनी गुरुवारी (दि. ५) केली.

‘गोकुळ’च्या निवडणुकीत शेतकऱ्यांनी नाकारलेल्या लोकांना ‘तज्ज्ञ’ म्हणून राज्य सरकार अध्यादेश काढून संचालक म्हणून घुसवत आहे. ते तज्ज्ञ असते, तर लोकांनी त्यांना नाकारले नसते. हा शेतकऱ्यांचा कौल नाकारण्याचा प्रकार आहे. हा राज्याच्या इतिहासात काळा दिवस आहे, असे पाटील यांनी सांगितले.

कोल्हापूरकरांचा अपमान

आपण स्वार्थासाठी लढत नाही. हा वैयक्तिक अपमान नाही. तर, कोल्हापूरच्या शेतकऱ्यांनी दिलेला कौल सरकारने पायदळी तुडवला आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या जनतेचा अपमान आहे. कोल्हापूरच्या स्वाभिमानाला ठेच लागली आहे. त्यामुळे ९ नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघेल, असे पाटील म्हणाले.

‘गोकुळ’ ‘अमूल’च्या घशात घालण्याचा डाव

‘गोकुळ’ दूध संघ ‘अमूल’च्या घशात घालण्याचा सरकारचा डाव आहे. ‘गोकुळ’मध्ये २० लाख लिटर दूध दररोज जमते. ‘अमूल’नंतर सर्वाधिक दूध संकलन ‘गोकुळ’मध्ये होते, असे ते म्हणाले.

हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटील हेच षड्‌यंत्राचे सूत्रधार

या षड्‌यंत्राचे मुख्य सूत्रधार हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील आहेत. त्यांच्याकडे बहुमत नसताना मुश्रीफ विरोधात का बसत नाहीत? मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेऊन हा डाव रचला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर कोणी आक्षेप घेतला नाही. त्यामुळे महायुतीच्या तिन्ही पक्षांची संमती असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले. मुश्रीफ म्हणतात की, ‘गोकुळ’मध्ये डेडलॉक झाला आहे; पण काही डेडलॉक नाही. हे लोकशाही ‘डेड’ करण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्हाला स्पष्ट बहुमत आहे. तुम्ही निवडणुकीला सामोरे जावा, असे आव्हान आ. पाटील यांनी दिले.

तांत्रिक मुद्दा करून बहुमत नाकारले जात आहे. आम्ही कोर्टात गेलो, तर कोर्टाने सरकारला फटकारले आहे. आम्हाला कोर्ट न्याय देईल; पण त्याबरोबर आम्ही रस्त्यावर उतरून ही लढाई लढत आहोत, असे ते म्हणाले.

‘गोकुळ’मध्ये बहुमतच चोरले : राहुल गांधी

नवी दिल्ली : ‘गोकुळ’ निवडणुकीत दूध उत्पादकांनी भाजपला पराभूत केले आहे. मात्र, निवडणूक निकालानंतर राज्य सरकारने चार संचालक नियुक्त करून त्यांना मताधिकार देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अल्पमतात असलेल्या १२ संचालकांच्या महायुतीचे १६ संचालक झाले आहेत. या प्रकारातून बहुमताची चोरी केली असून, दूध उत्पादकांच्या मतांचीही ही चोरी आहे. जनतेने जो कौल दिला आहे त्यामध्ये भेसळ करण्याचा हा प्रकार आहे. भाजपला इतके नैराश्य आले की, प्रत्येक ठिकाणी सत्ता वाचवण्यासाठी टोक गाठले जात आहे. शेतकरी हे कधीही विसरणार नाही हे दूध उत्पादकांच्या मतांची चोरी करणाऱ्या भाजपने लक्षात ठेवावे, असा इशारा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये दिला आहे.

सरकारचा निर्णय योग्य : पालकमंत्री आबिटकर

‘गोकुळ’ दूध संघावर शासन नियुक्त संचालक नेमणे याेग्यच आहे. ‘गोकुळ’चा कारभार योग्यरीतीने चालवण्यासाठी शासनाने घेतलेला हा निर्णय योग्य असल्याचे कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सोलापूर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

निर्णयातून जिल्हा बँका व साखर कारखाने का वगळले?

केवळ ‘गोकुळ’साठी निवडणूक झाल्यावर तेथील सत्ता काबीज करण्यासाठी स्वीकृत सदस्य नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि या निर्णयातून साखर कारखाने, जिल्हा बँका वगळल्या आहेत. त्यामुळे केवळ ‘गोकुळ’ला टार्गेट केले जात असल्याचा आरोप आ. पाटील यांनी केला.

सहकार गुजरातच्या घशात घालण्याचा डाव : थोरात

नाशिक : कोल्‍हापूरच्‍या ‘गोकुळ’ दूध संघास साडेपाच लाख शेतकरी जोडलेले आहेत. आ. सतेज पाटील यांच्या पॅनेलला १३ जागांचे स्पष्ट बहुमत मिळाले असतानाही केवळ १४ च्या कोरमचा नियम आड आणून अध्यक्ष निवड रोखली जात आहे. सत्ता नसलेल्या ठिकाणी चोरट्या मार्गाने नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकार नियम आणि कायदे बदलत असून, आपल्‍या महाराष्ट्रातील सहकार गुजरातच्या घशात घालण्याचा हा डाव आहे. मुख्यमंत्र्यांनी या पापाचे धनी होऊ नये, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT