मुंबई : गोवंडी परिसरातील झोपडपट्ट्यांवर मुंबई महापालिकेने पुन्हा कारवाईचा बडगा उगारला आहे. १४ फुटांपेक्षा अधिक उंचीच्या १५०० झोपड्यांना एम/पूर्व विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडून नोटिसा बजावण्यात आल्या असून, पुढील २४ तासांत वाढीव बांधकाम स्वतःहून हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवाजीनगर, बैंगनवाडी आणि डॉ. झाकीर हुसेन नगर परिसरातील रहिवाशांना या नोटिसा मिळाल्याने गोवंडीत खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र अधिनियम १९७१ अंतर्गत ही कारवाई करण्यात येणार असल्याचे नोटिशीत नमूद आहे. निवासी झोपड्यांसाठी १४ फूट, तर अनिवासी झोपड्यांसाठी १० फूट उंचीची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या मर्यादेपेक्षा अधिक असलेले बांधकाम हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच १४ फुटांपेक्षा कमी उंचीच्या झोपड्यांच्या अस्तित्वाबाबत १ जानेवारी २००० किंवा १ जानेवारी २०११ पूर्वीचे पुरावे २४ तासांत सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
दिलेल्या मुदतीत बांधकाम न हटवल्यास पोलिस बंदोबस्तात तोडकाम करण्यात येईल, असा इशारा पालिकेने दिला आहे. या कारवाईचा खर्च संबंधित झोपडीधारकांकडून वसूल केला जाणार आहे. कारवाईत अडथळा आणल्यास तीन वर्षांपर्यंत कारावास, पाच हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षांची तरतूदही नोटिशीत नमूद करण्यात आली आहे.
नोटिसा सदोष असल्याचा आरोप
अनेक रहिवाशांचा जन्म याच झोपड्यांमध्ये झाला असून, वर्षानुवर्षे वास्तव्य असताना अचानक घरे तोडण्याच्या नोटिसा मिळत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. गोवंडी सिटिझन्स वेल्फेअर फोरमनेही या नोटिसा सदोष असल्याचा आरोप केला आहे. प्रत्येक घराचे स्वतंत्र सर्वेक्षण, अचूक मोजमाप आणि सुनावणी न घेता नोटिसा बजावण्यात आल्याचा दावा फोरमने केला आहे. महापौर आणि महापालिका आयुक्तांनी तातडीने हस्तक्षेप करून या नोटिसा मागे घ्याव्यात, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
३९ हजार झोपड्या कारवाईच्या रडारवर
पालिकेच्या सर्वेक्षणानुसार मुंबईतील २ लाख २३ हजार १५० झोपड्यांपैकी तब्बल ३९ हजार १११ झोपड्या १४ फुटांपेक्षा अधिक उंचीच्या आहेत. यामध्ये पूर्व उपनगरांतील ३१ हजार २२७ झोपड्यांचा समावेश आहे. यापूर्वी पालिकेने ४ हजार ५८४ झोपड्यांवर कारवाई केली असून, ६११ झोपड्यांना नोटिसा बजावल्या होत्या.
राजकीय विरोधानंतरही कारवाईचे सत्र
यापूर्वी सप्टेंबरमध्ये पालिकेने १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत विशेष कारवाई मोहीम राबविण्याची घोषणा केली होती. मात्र, सर्वपक्षीय विरोधामुळे ही मोहीम थांबवण्याची मागणी करण्यात आली होती. आता पुन्हा नोटिसा बजावण्यास सुरुवात झाल्याने रहिवाशांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.