मुंबई : लाडका बाप्पा घरी विसवल्यानंतर भाविकांनी गौराई आगमनाची तयारी सुरू केली आहे. रविवारी सोन पावालांनी गौराई घरोघरी येणार असून यासाठी गुरुवारपासून बाजारपेठा साजशृंगाराने सजल्या असून महिला वर्गाने खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती.
गौरी सजावटीसाठी लागणारे साहित्य लालबाग, दादर, परळ, भुलेश्वर मार्केट, मंगलदास मार्केट याठिकाणी उपलब्ध आहे. स्टँड, मुखवटा, साडी, दागिने, पाऊलजोड आणि डेकोरेशनसाठी लागणार्या दिव्यांचा माळा उपलब्ध आहेत. गौरीचे विविध प्रकारचे सुंदर मुखवटे उपलब्ध आहेत. त्यामध्ये खळी मुखवटा, हसरा मुखवटा, अमरावती मुखवटा, सातारी मुखवटा, महालक्ष्मी मुखवटा आणि एकवीरा मुखवट्यांना विशेष मागणी आहे.
हे मुखवटे लाकूड, फायबर, पीओपी, प्लास्टिकपासून तयार केले जातात. तर यातील पीओपी चंदन पेंट मुखवटा आणि वॉर्निश पेंट मुखवट्याला अधिक मागणी असून हे मुखवटे 350 रुपयांपासून 2,800 पर्यंत मिळतात. तर शिवण लाकडापासून बनवलेल्या लाकडी मुखवट्यासह पूर्ण गौराई ही 35 हजारांपासून बाजारात उपलब्ध आहे. ज्याची गॅरेंटी विक्रेते किमान 50 वर्षांची देत आहेत. बाजारात पीओपी, फायबर आणि प्लास्टिक मुखवटेही उपलब्ध आहेत. प्लास्टिकमध्ये पारंपारिक पद्धत आणल्यामुळे धान्य भरणे शक्य असल्यामुळे बाजारात त्याची विशेष मागणी असल्याची माहिती दादर येथील साडीघर दुकानाचे मालक देतात. तसेच गौरीसाठी लागणारे सुट्टे हात आणि आशीर्वाद हात या दोन्ही प्रकारच्या हातांची मागणी अधिक आहे. ज्याची किंमत 250 रुपये आहे.
लाकडी गौरी : 35,000 रुपयांपर्यंत
फायबर गौरी 2,500 रुपयांपर्यंत
प्लास्टिक गौरी 1,500 रुपयांपासून
गौरीचे स्टँड 500 ते 600 (उंचीनुसार)
मुखवटा 300 ते 2,800 रुपयांपर्यंत
बसणारी गौरी 15,500 पर्यंत
उभी गौरी 7,500 ते 16,500 पर्यंत
महाराणी साडीची क्रेझ
गौराईला नेसवण्यात येणार्या साडीमध्ये यंदा महाराणी साडीची अधिक क्रेझ आहे. या साड्या गौराईच्या उंचीनुसार मिळतात. तसेच रेडिमेड साडीपेक्षा पसंतीनुसार या साड्या शिवून घेण्यावरही भर आहे. 550 ते 850 रुपये शिलाई घेतली जात आहे. रेडिमेड साड्या 750 रुपयांपासून 3,000 पर्यंत बाजारात आहेत.
गौरी म्हणजेच पार्वतीचे रूप आणि गणपती हा गौरीचा पुत्र आहे. त्यामुळे गणपतीसोबत गौरीचे स्वागतही आपल्याकडे थाटमाटात होते. आमच्या येथे तीन वर्षानंतर गौरी पाण्यात सोडण्याची परंपरा आहे. त्यामुळे आम्ही तीन वर्षांतून एकदा गौरीसाठी लागणारे सामान खरेदी करतो. परंतु, दरवर्षी गौरीसाठी लागणार्या सामानामध्ये विविधता मिळत असल्याने सामान खरेदी करताना अधिक उत्साह असल्याची प्रतिक्रिया भावना माळी या ग्राहकाने दिली.
दागिने 100 रुपयांपासून 10 हजारपर्यंत
गौराईला सजवण्यासाठी बाजारात विविध प्रकारचे दागिनेही उपलब्ध आहेत. ठुशी, लक्ष्मीहार, पोत्याची माळ, रत्नजडित मंगळसूत्र, कोल्हापुरी हार, बोरमाळ, तोडे, नथ हे विशेष विकले जात असून हे दागिने 100 रुपयांपासून 10 हजारपर्यंत उपलब्ध असल्याचे जयश्री कलेक्शनच्या जयश्री रमण यांनी सांगितले.
कानातले, नथ, बाजूबंद, कंबरपट्टा : 30 ते 150 ते 500
मुकुट/मोरमुकुट :
100 ते 600
हार-माला सेट : 50 ते 400
जड कुंदन/मोती सेट :
300 ते 800
मुकुट/मोरमुकुट :
100 ते 600
हलक्या वजनाचे, पुन्हा वापरता येणारे सेट्स जास्त पसंत करत असली तरी ठिकाणी पारंपरिक दागिन्याच्या खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. बाजारपेठांमध्ये 50 टक्के माल चायनावरुन आयात केला जातो तर 50 टक्के माल लोकल मार्केटमध्ये खरेदी केला जातो.