मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदानाची वेळ संपल्यावर 76 लाख लोकांनी मतदान केल्याचा आरोप करत याबाबत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
मुंबईचे रहिवासी असलेले याचिकाकर्ते चेतन चंद्रकांत अहिरे यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेवर विचार करण्यास न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने नकार दिला. न्यायालयाचा संपूर्ण दिवस यामुळे वाया गेला, असा ठपकाही खंडपीठाने ठेवला.
प्रत्यक्ष झालेले मतदान आणि निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवर नोंदवलेले मतदान यात विसंगती असल्याचा दावा एका राजकीय विश्लेषकाने मांडलेल्या मताच्या आधारे याचिकेत केला आहे. त्याला कोणताही ठोस पुरावा नाही. यासंदर्भात कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. त्यामुळे ही याचिका अर्थहीन असल्याचे स्पष्ट करत खंडपीठाने ती फेटाळून लावली.
विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्ष झालेले मतदान आणि निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवर नोंदवलेले मतदान यात विसंगती असल्याचा याचिकाकर्त्याने केलेला दावा वृत्तपत्रातील लेखाच्या आधारे व केतन पाठक या राजकीय विश्लेषकाने मांडलेल्या मताच्या आधारे केला आहे. या आधारे रिट याचिका कशी दाखल केली जाऊ शकते, याचे आम्हाला आश्चर्य वाटते.
याचिकाकर्ता कोणतेही ठोस पुरावे सादर करू शकलेला नाही.
हरी विष्णू कामथ प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा दाखला देत अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केलेला युक्तिवाद न्यायालयाला मान्य करता येणार नाही.
विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत घोळ झाल्याने राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघांमधील जाहीर झालेले निकाल रद्द करावेत, अशी मागणी याचिकाकर्त्याने न्यायालयात केली होती.
सायंकाळी सहा वाजता या अधिकृत मतदान वेळेनंतर जास्तीचे मतदान झाल्याचे याचिकेत अधोरेखित करण्यात आले होते
विशेषतः, मतदानाची वेळ संपल्यानंतर 76 लाखांहून अधिक जणांनी मतदान केल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता.
राज्यातील नव्वदहून अधिक मतदारसंघांमध्ये मतदान झालेल्या आणि मोजलेल्या मतांमध्ये तफावत दिसून आल्याचा दावाही याचिकेत केला होता.