मुंबई : इंटाग्रामवर मित्रांसोबत चॅट करताना शिवीगाळ करतो म्हणून रागाच्या भरात वडिलांनी मारहाण केल्याने एका चौदा वर्षांच्या मुलाने घरातून पलायन केले होते. या मुलाला कासिम मुर्शरफअली खान, महेंद्र विष्णू कश्यप आणि संजय राधेश्याम सचेती यांनी राजस्थानात नोकरीसाठी नेले. तिथे त्याला एका मंदिरात कामावर ठेवले. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच तीन महिन्यानंतर तिन्ही आरोपींना दिडोंशी पोलिसांनी अटक केली.
याप्रकरणातील तक्रारदार चालक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत गोरेगाव परिसरात राहतात. त्यांचा मोठा मुलगा त्याच परिसरातील एका खासगी शाळेत शिकतो. 6 डिसेंबर 2025 रोजी इंटाग्रामवर चॅट करताना मित्रांशी शिवीगाळ करत असल्याने त्याच्या वडिलांनी त्याला मारहाण केली होती. त्यामुळे तो घरातून निघून गेला होता. बराच वेळ होऊन तो घरी आला नाही. त्यामुळे त्याच्या वडिलांनी दिडोंशी पोलिसांत
तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा नोंदवून सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी तीन महिन्यानंतर मुलाला राजस्थानातून ताब्यात घेतले होते. तपासात तो घरातून निघून गेल्यानंतर सीएसएमटी रेल्वे स्थानकात आला होता. तिथे त्याला तिघांनी नोकरी देतो, असे सांगून राजस्थानात गेले. तेथील एका मंदिरात महाप्रसाद वाटप करण्याच्या कामावर ठेवले.
पोलिसांच्या तपासात आलेल्या या माहितीनंतर त्याला राजस्थानात नेणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. या तिघांवर अपहरणाच्या गुन्ह्यांत अटकेची कारवाई करण्यात आली. अटकेनंतर या तिघांनाही बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकणातील मुलाचा ताबा त्याच्या पालकांकडे देण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे यांनी सांगितले.