मुंबई : गोरेगाव पूर्वकडील दिंडोशी येथील गोकुळधाम परिसरातील लक्ष चंडी हाईट्स नावाच्या इमारतीला रविवारी भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत सहाव्या मजल्यावरील इंदू तारकेश्वर सिंग नावाच्या महिलेचा होरपळून मृत्यू झाला.
गोकुळधाममधील लक्ष चंडी हाईट्स इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील बी/604 या सदनिकेमध्ये अचानक आग लागली. आगीचे स्वरूप इतके भीषण होते की क्षणात धुराचे लोट पसरले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले.
या दुर्दैवी घटनेत सदनिकेमध्ये असलेल्या इंदू तारकेश्वर सिंग ही महिला गंभीररीत्या भाजली होती. तिला तातडीने उपचारासाठी जवळच्या लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. वारंवार लागणाऱ्या आगींमुळे रहिवाशांमध्ये भीती पसरली असून गोकुळधाम परिसरात आगीच्या घटनांचे सत्र थांबताना दिसत नाहीये.
काही दिवसांपूर्वीच याच परिसरातील डीबी वुड्स या इमारतीमध्येही आगीची घटना घडली होती. लागोपाठ घडणाऱ्या या दुर्घटनांमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
इमारतीमधील अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित होती? आगीचे नेमके कारण काय, याचा तपास सध्या पोलीस आणि अग्निशमन दल करत आहे.