मुंबई : पुढारी वृत्तसेवा गोरेगाव पुर्वकडील फिल्मसिटीलगत असलेल्या आरे युनिट क्रमांक ३२ जवळ नागरमोडीपाड्यातील झोपड्यांना २० फेब्रुवारी रोजी आग लागल्यानंतर आता पुन्हा गोरेगाव येथील वाघेश्वरी मंदिराजवळ असलेल्या झोपड्या आणि गोदामांना रविवार, ९ मार्च रोजी सांयकाळी ७ वाजेच्या सुमारांस भीषण आग लागली. सुदैवाने या आगीत कुठलीही जिवितहानी झाली नसून झोपड्या, दुकाने आणि गोदामातील सामान जळून खाक झाले.
वाघेश्वरी येथील परिसरात अतिक्रमण असलेल्या जागी लाकडाची वखारे, फर्निचर आणि फिल्म शुटिंगचे गोडाऊन होते. आगीची माहिती कळताच घटनास्थळी अग्निशामन दलाच्या जवानांनी धाव घेवून बचाव कार्य सुरु केले होते. लेव्हल दोनची आग असल्याने अग्निशामन दलाच्या दोन गाड्या, १०८ रूग्णवाहिका आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. आग कशामुळे लागली, हे अद्यापही समजू शकले नाही. अग्निशामन दलाच्या चौकशी सुरु असून त्यानंतरच आगीचे कारण समजू शकेल, असे सांगण्यात आले.
२० फेब्रुवारी रोजी चित्रपटनगरी येथील झोपड्यांना आग लागली होती. आता पुन्हा काही अंतरावर असलेल्या वाघेश्वरी परिसरातील झोपड्या, दुकाने आणि गोडाऊंनला आग लागल्याने गोरेगावात मोठ्या प्रमाणात शासकीय जागेवर झालेले अनधिकृत अतिक्रमणे चव्हाट्यावर आली आहेत, आता महापालिका, पोलीस काय कारवाई करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.