कांदिवली : बोरिवली गोराई 2 येथील मंगलमूर्ती मार्गाची दूरवस्था झाली आहे. मार्गात अनेक ठिकाणी लहान मोठे खड्डे, उंच सखलपणा निर्माण झाला आहे. दुभाजकांची कचरा पेटी झाली असून, दुभाजाकांचे सिमेंट ठोकळे अस्तव्यस्त पडले आहेत.दयनीय अवस्थेतील या मुख्य मंगलमूर्ती मार्गावर नेहमीच वाहतूककोंडी होत असते. येथून नागरिकांना चालणेही जिकरीचे झाले आहे. वाहन चालकांसह प्रवाशांना नाहक त्रास सहन करतच प्रवास करावा लागत आहे. सदर मार्गाचे तातडीने नूतनीकरण करा, अशी मागणी वाहन चालकांसह नागरिकांकडून केली जात आहे.
गोराई 2 येथील मंगलमूर्ती मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. मार्ग अरुंद असून दुतर्फा अनधिकृत व्यवसायिकांनी बस्तान मांडले आहे.यामुळे मार्ग अधिकच अरुंद झाल्याने या मार्गाची दूरवस्था झाली आहे.
पदपथावर विद्युतची मुख्य केबल पडलेली आहे. मार्गात प्रचंड धुळमाती असून जागोजागी खड्डे, उंच सखलपणा आहे. यामुळे वाहनांच्या गतीला ब्रेक मिळतो परिणामी नेहमीच वाहतूककोंडी होते. दुभाजाकांमध्ये कचरा घाण आणि तुटलेले, फाटलेले बॅनर पडले आहेत. काही ठिकाणी दुभाजकांचे सिमेंट ठोकळे आजूबाजूला पडलेले आहेत. यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे.
या मार्गावर हॉस्पिटल्स, चार सभागृह, नालंदा लॉ कॉलेज प्रगती विद्यालय आहे. यामुळे सदर मार्गाची अवस्था, पडलेले खड्डे, दुभाजकांची झालेली कचरापेटी आदींचा नाहक त्रास विद्यार्थ्यांसह प्रवाशांना आणि वाहन चालकांना गेल्या कित्येक महिन्यांपासून सहन करावा लागत आहे.
महापालिकेने तातडीने मुख्य मार्गाचे नूतनीकरण करून दुभाजाकांमध्ये शोभेची झाडे लावावीत जेणेकरून वाहनचालकांसह, प्रवासी आणि स्थानिकांना दिलासा मिळेल, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
सर्वात श्रीमंत असलेली महापालिका नागरिकांच्या सुविधांसाठी करोडो रुपये खर्च करत असली तरी, मुख्य मार्गाची अवस्था पाहाता नागरिकांच्या पैशांचा दुरुपयोग होत आहे असेच वाटते. गुणवत्ता नाही, गांभीर्य नाही हे नागरिकांचे दुर्दैवच म्हणावे लागेल.प्रकाश गिरी, लॉ कॉलेज विद्यार्थी