Maharashtra Assembly Monsoon Session 2025 Gopichand Padalkar
मुंबई : विधासभा सभागृहात आज (दि. १८) भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि तालिका अध्यक्षांमध्ये वाकयुद्ध रंगले. "मला बोलायचं नाही माझी लक्षवेधी रद्द करा," असे पडळकर म्हणाले. त्याचवेळी पडळकर आणि शिंदे गटाचे नेते मंत्री दादा भूसे यांच्यातही खडाजंगी झाली.
आज विधानसभेत आमदार पडळकर यांनी बिंदु नामावलीचा मुद्दा मांडला. पडळकर म्हणाले, सरळसेवा शिक्षक भरती रद्द प्रकरणात बिंदू नामावलीमध्ये घोटाळा झाला आहे. १९७० ला बिंदू नामावली पहिल्यांदा आली. त्यात अनेकवेळा बदल झाले. जेव्हा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आला तेव्हा त्यात बदल झाला. नंतर विमुक्त जाती प्रवर्ग केला. २०२८ ला मराठा आरक्षणामुळे बिंदू नामावलीत बदल केला. मात्र बिंदू कसे निश्चित करायचे याचीसुद्धा एक प्रक्रिया असल्याचे पडळकर यांनी सांगितले. या लक्षवेधीवरच बोलत असताना तालिका अध्यक्षांनी त्यांना थांबवलं आणि पॉइंटेड प्रश्न मांडण्यास सांगितले. यावरून पडळकर आणि तालिका अध्यक्षांमध्ये वाकयुद्ध रंगले.
पडळकर म्हणाले, "मला या विषयावर बोलायच नाही. माझी लक्षवेधी रद्द करा. मला उत्तर नकोय. न्याय द्यायचा नसेल आणि २-३ लाख लोकांवर अन्याय झाला असताना सरकारची अशी भूमिका चुकीची आहे," असे ते म्हणाले. यावर उत्तर देण्यासाठी मंत्री दादा भूसे उभे राहिले. "वेळेवर तुम्ही उपस्थित नव्हता. तरीही विषयाच गांभीर्य लक्षात घेऊन मी थांबलो," असे दादा भूसे म्हणाले. यावर तुम्ही मला ऐकवू नका, असे पडळकर म्हणाले. यावरून दोघांमध्ये खडाजंगी झाली. "वस्तुस्थिती समजून घ्या. आपल्या मुद्द्यांची चौकशी करून कारवाई करू. पण आताच्या घडीला जी आकडेवारी आहे आणि जी कार्यपद्धती संपन्न झाली आहे, ती देखील समजून घ्या," असे दादा भूसे म्हणाले.