gopichand padalkar sharad pawar:
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा शाब्दिक हल्ला चढवला आहे. 2026 मध्ये शरद पवार यांची राज्यसभा खासदारकीची मुदत संपत असल्याने, ते कुठून निवडून येणार, असा सवाल पडळकर यांनी विचारला.
आमदारकीच्या संख्याबळावर बोट ठेवत पडळकर यांनी राष्ट्रवादीला चिमटा काढला आहे. "दहा आमदारांवर राज्यसभा जिंकता येत नाही," असे म्हणत त्यांनी शरद पवार यांच्या पुढील राजकीय वाटचालीबद्दल शंका व्यक्त केली.
वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधिंना प्रतिक्रिया देताना गोपीचंद पडळकर म्हणाले, "माझ्या मनाला प्रश्न पडला आहे की आता शरद पवार यांची खासदारकी संपते आहे.10 आमदार असतील तर खासदार होत नाही, त्याला आमदार जास्त लागतात. तर ते जास्त आमदार कुठून येतील, असा मला प्रश्न पडला आहे."
पडळकर यांनी आपल्या उत्तरासाठी एप्रिल महिन्याची वाट पाहू, असेही सांगितले. सध्या राष्ट्रवादीकडे (शरदचंद्र पवार गट) किती आमदार आहेत, यावर बोलताना ते म्हणाले, "आता तरी 10 त्यांच्याकडे दिसतील. ते पण शरीराने किती आहेत आणि मनाने किती आहेत, हे मला माहीत नाही. मी त्यापुढचा विचार करतोय."
पडळकर यांनी 'तुतारीवाले' (राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार गटाचे निवडणूक चिन्ह) आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा अप्रत्यक्षपणे केला. "बरेच जण इकडे येऊन भेटत राहतात. पत्रकाराला उद्येशून पडळक म्हणाले तुमच्या जिल्ह्यात तुम्हाला माहीत आहे, सगळ्यात जास्त तुमच्या जिल्ह्यात आहेत ना तुतारीवाले. त्यामुळे तुम्हाला माहीत आहे सगळं कुठे असतात काय असतात," हे विधान करून पडळकर यांनी शरद पवार यांच्या आमदारांमध्ये देखील सत्तेशी जुळवून घेण्याची धडपड असते असे संकेत दिले.
पडळकरांच्या या वक्तव्यामुळे 2026 मधील राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यावर काय प्रत्युत्तर देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.