मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आता निर्यातदार आपल्या बॅगेमध्ये सोन्याचे दागिने आणि मौल्यवान रत्ने बिनधास्त घेऊन जाऊ शकणार आहेत. जेम अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल (जीजेईपीसी) आणि मुंबई सीमा शुल्क विभागाच्या सहकार्याने निर्यातवाढीसाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ज्वेलरी हँड कॅरेज फॅसिलिटेशन सेंटर उभारण्यात आले आहे. देशातून होणाऱ्या सोने आणि मौल्यवान दागिन्यांच्या निर्यातीपैकी ६५ ते ७० टक्के निर्यात मुंबईतून होते. या फॅसिलिटेशन सेंटरमुळे निर्यातवाढीस चालना मिळणार आहे. एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलने मुंबई विमानतळावर भाड्याने जागा मिळवत निर्यातीच्या दृष्टीने सुसज्ज केली आहे. आता हा परिसर कस्टम क्षेत्र म्हणून अधिसूचित झाला आहे. भारत डायमंड बोर्सला कस्टोडियन म्हणून नियुक्त केले आहे. त्यामुळे या केंद्रातून चोवीस तास हाताने मौल्यवान दागिन्यांची निर्यात करता येणार आहे.
आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये मुंबई पोर्टमधून १,९६५ कोटी ३२ लाख ४० हजार कोटी डॉलरचे मौल्यवान खडे आणि दागिन्यांची निर्यात झाली होती. सरकारने दिलेल्या मंजुरीनंतर मुंबई विमानतळावरील टर्मिनल-२ मध्ये फॅसिलिटेशन सेंटर उभारण्यात आले आहे. आता येथून उच्च मूल्यदराच्या दागिन्यांची निर्यात बॅगमधूनही करता येणार आहे. व्यवसाय सुलभीकरणासाठी वेगवान मंजुरी दिली जाणार आहे. यासाठी मुंबई सीमा शुल्क विभाग, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा फोर्स, पोलिस, विमानतळ प्रशासनाच्या सहकायनि एक खिडकी योजना करण्यात आली आहे.
परराष्ट्र व्यापार धोरणात नमूद केलेल्या निवडक विमानतळांवरून रत्ने आणि दागिन्यांची वैयक्तिक वाहतूक करण्यास परवानगी आहे. निर्यातीसाठी, दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, कोची, कोईम्बतूर, बंगळूर, हैदराबाद आणि जयपूर येथे ही सुविधा आहे. आयातीसाठी, दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळूर, हैदराबाद आणि जयपूर येथे वैयक्तिक वाहतूक करण्यास परवानगी आहे. हाताने वाहतूक करण्याची सुविधा आता कोलकाता, जयपूर, मुंबई आणि दिल्ली येथे उपलब्ध झाली आहे.
निर्यातदार सदस्यांसाठी व्यवसाय सुलभता वाढवण्याच्या आमच्या प्रयत्नात हा मैलाचा दगड ठरणार आहे. ई-कॉमर्स निर्यात चॅनेलसह एमएसएमई आणि उच्च-मूल्य असलेल्या सामानाच्या वाहतुकीसाठी याचा फायदा होईल. संयुक्त अरब अमिराती (यूएई), ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटन यासारख्या व्यापार भागीदार राष्ट्रांशी व्यापार करणे सुलभ होणार आहे.किरीट भन्साळी, अध्यक्ष, 'जीजेईपीसी'