Fuel Price Hike file photo
मुंबई

Fuel Price Hike: सर्वसामान्यांना युद्धाच्या झळा; पेट्रोल आणि खाद्यतेलाच्या दरात वाढ

Iran Israel conflict impact India: पश्चिम आशियातील संघर्ष आता तिसऱ्या आठवड्यात पोहोचला असून, भारतासह संपूर्ण जगावर याचे परिणाम स्पष्टपणे दिसू लागले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

Fuel Price Hike:

नवी मुंबई: पश्चिम आशियातील संघर्ष आता तिसऱ्या आठवड्यात पोहोचला असून, भारतासह संपूर्ण जगावर याचे परिणाम स्पष्टपणे दिसू लागले आहेत. सध्या देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरवठा सामान्य आहे, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले असले, तरी परिस्थिती चिंताजनक असून पेट्रोल आणि खाद्यतेलाच्या दरात आज वाढ झाली आहे.

इराण इस्राईल अमेरिका युद्धामुळे कच्च्या तेलाची निर्यात कमी प्रमाणात होत असल्याने त्याचा परिणाम आता तेलाच्या निर्यातीवर झाला असून तेलाचे दर वाढले आहेत. १३ किलोच्या डब्यावर २०० रुपये वाढले असून युद्धाची स्थिती अशीच राहिली तर दर आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

स्पीड पेट्रोलचे दर वाढले

पेट्रोल पंपातील स्पीड पेट्रोलमध्ये २ रुपये ९ पैशांनी वाढ झाली आहे. एचपीसीएल, बीपीसीएल आणि इंडियन ऑईल अशा तेल कंपन्यांच्या स्पीड पेट्रोलच्या दरात ही वाढ झाली आहे. साध्या पेट्रोलच्या दरात मात्र अद्याप वाढ झालेली नाही.

इराण वरून येणारा पिस्ता बंद झाल्याने दर गगनाला भिडले

नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात इराण वरून अनेक ड्रायफ्रुट्स पदार्थ बाजारात आयात केले जातात, मात्र यावेळी इराण सोबतच इस्रायल अमेरिका युद्ध सुरू असल्याने आयात पूर्णपणे बंद आहे. परिणामी उपलब्ध ड्रायफ्रूटचे भाव गगनाला भिडले असून पिस्त्याचे दर किलोमागे तब्बल सहाशे रुपयांनी वाढले आहेत.

१ हजार ८०० रुपये किलोला मिळणारा पिस्ता थेट २ हजार सहाशे रुपयांना विकला जात आहे. रमजान आणि हिंदू सणांची लगबग सुरू असताना मोठ्या प्रमाणावर दर वाढल्याने ग्राहक खरेदीमध्ये आखडता हात घेत असल्याचे चित्र आहे. युद्ध थांबले नाही तर वाढलेल्या दरात दुप्पट वाढ होण्याची भीती व्यापारी व्यक्त करत आहेत. त्यामुळे युद्ध थांबावे, अशी इच्छा व्यापारी व्यक्त करत आहेत.

भारताची पर्यायी रणनीती

भारताच्या ऊर्जाविषयक गरजांचा मोठा हिस्सा अजूनही पश्चिम आशियावर अवलंबून आहे. देशातील ९० टक्के इंधन आयात याच क्षेत्रातून होते आणि एलएनजीचा मोठा भाग कतारमधून येतो. कतारमधील रास लफान गॅस हबवर झालेल्या हल्ल्यामुळे परिस्थिती अधिक संवेदनशील बनली आहे. हा धोका ओळखून सरकारने अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांकडून गॅस व एलपीजी पुरवठा वाढवण्याची रणनीती आखली आहे. तसेच, पीएनजी (पाईप्ड नॅचरल गॅस) नेटवर्कच्या विस्तारावर भर दिला जात असून, गेल्या दोन आठवड्यांत सुमारे १.२५ लाख नवीन कनेक्शन देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT