मुंबई : राज्यातील वैद्यकीय शिक्षणात मुलींचा सहभाग सातत्याने वाढत असून ‘एमबीबीएस’ अभ्यासक्रमात गेल्या दहा वर्षांत त्यांची प्रवेशसंख्या दुपटीहून अधिक झाली आहे. 2015-16 मध्ये केवळ 1 हजार 737 मुलींना प्रवेश मिळाला होता; तर 2025-26 मध्ये हा आकडा तब्बल 4 हजार 40 वर पोहोचला आहे. यंदाच्या सत्रात तर उपलब्ध जागांच्या जवळपास 50 टक्के जागा मुलींनी पटकावल्या आहेत.
सरकारी आणि खासगी महाविद्यालयांच्या प्रवेश आकडेवारीतूनही महिलांचा वाढता कल स्पष्ट दिसून येतो. 2020-21 पर्यंत सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलींची संख्या खासगी महाविद्यालयांपेक्षा जास्त होती. मात्र 2021-22 पासून दोन्ही क्षेत्रांतील अंतर कमी होत गेले. चालू शैक्षणिक वर्षात सरकारी महाविद्यालयांमध्ये 2,140 मुलींनी ‘एमबीबीएस’ला प्रवेश मिळवला, तर खासगी महाविद्यालयांत 1,900 मुलींनी वैद्यकीय शिक्षणाची वाट धरली. खासगी संस्थांतील ही वाढ विशेषतः लक्षणीय मानली जात आहे.
मुलांच्या तुलनेत मुलींच्या प्रवेशाचा वेगही उल्लेखनीय आहे. 2016-17 मध्ये मुलांचे 1 हजार 928 तर महिलांचे 2 हजार 38 प्रवेश नोंदले गेले होते. त्यानंतरच्या प्रत्येक वर्षात ही संख्या सातत्याने वाढत गेली. 2024-25 मध्ये प्रथमच मुलींची संख्या 3 हजार 797 वर पोहोचली आणि 2025-26 मध्ये तिने 4 हजारांचा टप्पाही ओलांडला. महिलांची ही झेप राज्यातील वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वाचा सामाजिक बदल ठरत आहे. वैद्यकीय शिक्षणाकडे महिलांचा वाढता कल, ग्रामीण भागातील शिक्षणातील सुधारणा, सरकारी शिष्यवृत्ती योजनांचा फायदा आणि कुटुंबीयांचा वाढता पाठिंबा या घटकांचा या बदलावर मोठा प्रभाव असल्याचे सीईटी कक्षातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.