मुंबई : बाथटबमध्ये बुडून एका चार वर्षांच्या गतिमंद मुलीचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री उशिरा गोरेगाव येथील राजीव गांधी नगर परिसरात घडली.
या परिसरात 35 वर्षांचे गृहस्थ कुटुंबीयांसोबत राहतात. त्यांना ही चार वर्षांची मुलगी होती. ती गतिमंद असल्याने तिला नीट चालता-बोलता येत नव्हते. तिला लहानपणापासून फिटचाही आजार होता. तिच्यावर चेंबूरच्या न्यूरोलॉजिस्टकडून उपचार सुरु होते. सोमवारी त्यांच्या घरी पूजा होती. सर्व नातेवाईक आणि मित्रमंडळी गेल्यानंतर सर्वांनाच झोपण्यास उशीर झाला होता. मुलगी तिच्या आईसोबत झोपली होती. मात्र, दुसर्या दिवशी सकाळी तिच्या आईला ती बाथरुममध्ये टबच्या पाण्यात पडल्याचे दिसून आले. तिची काहीच हालचाल होत नसल्याने तिला पालकांनी तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
ही घटना समजताच दिंडोशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलीच्या वडिलांचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला. त्यांनी घडलेला प्रकार सांगून या घटनेमागे कोणावरही संशय व्यक्त केला नाही किंवा तक्रार केली नाही. त्यामुळे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करुन तपास सुरु केला आहे. शवविच्छेदन अहवाल अद्याप पोलिसांना प्राप्त झालेला नाही. मंगळवारी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.