Girish Kulkarni Interview
मुंबई: "पैसा आला की माणसाला वाटतं मी श्रेष्ठ आहे, पण प्रत्यक्षात तो आपल्याच डबक्यात डराव डराव करणारा बेडूक असतो. तुमचा इगो तुम्हाला कधीच शांतपणे मरू देत नाही, तो सतत तोंड वर आणत असतो. आम्ही खिडक्यांना जाळ्या लावल्या, शेजाऱ्यांना नाकरलं आणि स्वत:लाच कोंडून घेतलं आहे. लोकांकडे आज माहितीचा डोंगर आहे, पण अनुभवाचं शहाणपण शून्य आहे," अस मनमोकळे भाष्य अभिनेते आणि लेखक गिरीश कुलकर्णी यांनी सध्याच्या जीवन पद्धतीवर केले. 'अमुक तमुक' पॉडकास्टमध्ये दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या अभिनय शैलीपासून ते समाजमनातील बदलांपर्यंत अनेक विषयांवर प्रहार केला.
गिरीश कुलकर्णी यांच्या अभिनयातील जिवंतपणाचे नेहमीच कौतुक होते. यावर बोलताना ते म्हणाले, "मी अभिनयाचा कोणताही रितसर कोर्स केला नाही, पण अनेक दिग्गजांच्या पायाशी बसून मी हे काम चोरून शिकलो. कोणतीही भूमिका करताना समोरच्या प्रेक्षकाला मी 'नट' न वाटता तो 'माणूस' वाटावा, हीच माझी ध्येयपूर्ती असते. माझ्या आयुष्यात मी कधीच विशिष्ट ध्येय किंवा उद्दिष्ट ठेवून काम केले नाही. जे काही समोर येईल ते आनंदाने करणे आणि त्यात स्वतःचा शोध घेणे, हाच माझा प्रवास आहे."
यावेळी गिरीश कुलकर्णी यांनी त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक विचारसरणीवर बोलताना म्हणाले की, "मी एक असा माणूस आहे ज्याला निश्चित असे काही ध्येय नाही. मला सगळंच करून पाहायचं आहे आणि जे काही करायचं आहे ते आनंदाने करायचं आहे. सुरुवातीच्या काळात केवळ आनंदासाठी काम करणे सुरू होते, पण आता हळूहळू कामातच आनंद शोधण्याची समजूत आली आहे. लहानपणी कोपऱ्यात बसून लोकांचे निरीक्षण करणे, त्यांच्या हालचालींमधून कथा विणणे हा माझा छंद होता. आजच्या काळात मात्र लोक 'गॅजेट्स'मध्ये इतके अडकले आहेत की त्यांना प्रत्यक्ष अनुभव घेता येत नाही. आपण निसर्गापासून आणि साधेपणापासून खूप दूर गेलो आहोत," अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
प्रसिद्धी, लोकप्रियता आणि भौतिक सुखांच्या मागे धावण्याबाबत बोलताना ते म्हणाले की, एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचल्यानंतर माणसाला क्षितिजाची विशालता समजते. "गाडी, घोडा, प्रसिद्धी किंवा स्पर्धा या भ्रमाच्या मागे धावण्यात अर्थ नाही. त्यापेक्षा सतत निर्मितीत राहणे आणि त्यातून स्वतःचा अर्थ शोधणे जास्त महत्त्वाचे आहे. आपली ओळख ही केवळ लोकांनी दिलेली नावे नसून, ती आपल्याला स्वतःला शोधून काढावी लागते," असेही त्यांनी नमूद केले.
सोशल मीडियामुळे वाढलेल्या दिखाऊपणावर ते म्हणाले की, "आज प्रत्येकाला प्रसिद्ध व्हायचे आहे, पण 'मी' पणाच्या अहंकारात आपण इतरांचे अस्तित्व मान्य करायला विसरतोय. यश आणि अपयश या केवळ व्याख्या आहेत. खरं तर अपयश खूप मजेशीर असते, ते तुम्हाला जमिनीवर ठेवते आणि लोकांच्या अपेक्षांपासून मुक्त करते."
"माझं अज्ञान मला प्रिय आहे, कारण त्यातूनच कुतूहल आणि निरागसता जपली जाते. आजच्या माहितीच्या महापुरात आपण इन्फॉर्मड आहोत, पण अनुभवी आहोत का? हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे."
आयुष्याची तुलना नर्मदा परिक्रमेशी करताना गिरीश कुलकर्णी यांनी सांगितले की, ज्याप्रमाणे नर्मदा मैया परिक्रमेत नवनवीन रूपे आणि अनुभव दाखवते, तसेच आयुष्य आहे. जग बदलत आहे, हवामान बदलत आहे, या सगळ्या बदलांचे विभ्रम पाहत पुढे जाणे हेच खरे जगणे आहे.
आपल्या जडणघडणीबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, त्यांना नशिबाने घरातून कधीच ठराविक टक्केवारी मिळवण्याचे किंवा स्पर्धेत उतरण्याचे दडपण नव्हते. सुरक्षिततेच्या त्या चौकोनी चौकटीत न अडकल्यामुळेच त्यांना मुक्तपणे विचार करण्याची आणि लोकांशी मैत्री जोडण्याची संधी मिळाली, ज्यामुळे आजचा कलाकार घडला.
मुलाखतीच्या शेवटी त्यांनी त्यांच्या आगामी 'बाप्या' या चित्रपटाबद्दल माहिती दिली. १५ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात एक आगळावेगळा विषय हाताळण्यात आला आहे. "मराठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याची संस्कृती जपली पाहिजे," असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.