Mumbai crime news
मुंबई: घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या स्वच्छतागृहात ६० वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिला मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. गुरुवारी रात्री उशिरा ही घटना घडली. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी शुक्रवारी घाटकोपरमधील असल्फा येथून २५ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. तस्लीम नूर मोहम्मद असे त्याचे नाव आहे. या घटनेमुळे उपनगरीय रेल्वे स्थानकांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पीडित महिला खादावली येथे राहते आणि रोजंदारीवर काम करण्यासाठी घाटकोपरला येते. गुरुवारी तिच्यासोबत तिची १८ वर्षांची मुलगीही होती. काम आटोपल्यानंतर दोघी खडवलीला जाण्यासाठी घाटकोपर रेल्वे स्थानकावर पोहोचल्या. मुलगी फलाट क्रमांक दोनवर थांबली असताना, महिला रात्री ११.१२ वाजता स्वच्छतागृहात गेली. तेथे कोणीही कर्मचारी उपस्थित नव्हता. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक तरुण प्रसाधनगृहात शिरताना दिसून आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या तरुणाने आतून दरवाजा बंद केला आणि प्रसाधनगृहाच्या पॅसेजमध्ये महिलेवर अत्याचार केला. रात्री ११:१९ वाजता तो तरुण बाहेर पडून घाटकोपर मेट्रोच्या दिशेने घाईघाईने निघून गेल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.
सुमारे ११.२२ वाजता महिला स्वच्छतागृहातून बाहेर आली आणि तिने घडलेला प्रकार मुलीला सांगितला. त्यानंतर दोघींनी फलाट क्रमांक ४ वरील जीआरपी केंद्राशी संपर्क साधला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. महिला पोलिसाने पीडितेची चौकशी करून तिचा जबाब नोंदवला. त्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी तिला घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिसांनी घाटकोपर रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यात आरोपीच्या हालचाली दिसून आल्या. आरोपी आत जाताना आणि बाहेर पडताना कॅमेऱ्यात कैद झाला. पोलिसांनी रेल्वे स्थानक आणि मेट्रो परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मिळालेल्या धाग्यादोऱ्यांवरून पोलिसांनी घाटकोपरच्या आल्फा परिसरातून आरोपीला ताब्यात घेतले.