मुंबई

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेदिवशी ‘लोकल’मधून पडून ५ मुंबईकरांनी गमावला होता जीव

अविनाश सुतार

मुंबई: पुढारी वृत्तसेवा: मुंबईकरांना सोमवारी (दि.१३) झालेल्या पहिल्या वादळी पावसाने उन्हाच्या तडाख्यातून काहीसा दिलासा मिळाला. मात्र,  त्यादिवशी घाटकोपर पूर्वेला पेट्रोल पंपावर कोसळलेल्या होर्डिंगमुळे १६ निष्पाप मुंबईकरांचा जीव गेला. तर वादळामुळे विस्कळित झालेल्या लोकलच्या वाहतुकीमुळे संध्याकाळी घरी जाण्यासाठी निघालेल्या मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. लोकलची वाहतूक रखडल्याने गर्दीतून प्रवास करताना तोल जाऊन त्या दिवशी तब्बल पाच जणांचा मृत्यू झाला.

घाटकोपरमध्ये सोमवारी नेमकं काय घडलं होतं ?

  • मुंबईत सोमवारी पहिल्या वादळी पावसाचा तडाखा
  • घाटकोपर पूर्वेला पेट्रोल पंपावर होर्डिंग  कोसळले.
  • या दुर्घटनेत  १६ निष्पाप मुंबईकरांचा जीव गेला.
  • लोकलची वाहतूक रखडली,  गर्दीतून प्रवास करताना तब्बल पाच जणांचा मृत्यू झाला.

या दुर्घटनेत तब्बल १०० पेक्षा जास्त नागरिक अडकले होते.

उन्हाच्या झळा वाढल्याने जीवाची काहिली झालेले मुंबईकर पावसाची चातकाप्रमाणे वाट पहात असताना सोमवारी दुपारी अचानक सोसाट्याचा वारा सुटला. मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरात पावसाने हजेरी लावली. पाऊस पडू लागल्याने मुंबईकरांना गारवा अनुभवायला मिळाला. मुंबईकर खुश झाले. परंतु काही वेळातच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घाटकोपर पूर्वे येथील रेल्वे पोलिसांच्या जागेवरील पेट्रोल पंपावर तेथेच उभारलेले महाकाय होर्डिग पंपावर कोसळले. या दुर्घटनेत तब्बल १०० पेक्षा जास्त नागरिक अडकले होते. या अपघातात आतापर्यत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मुंबईतील अनधिकृत होर्डिगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. होर्डिंग उभारण्यासाठी देण्यात येणारी परवानगी, जागा कुणाची, जबाबदारी कुणाची यावरुन महापालिका, रेल्वे प्रशासनात वाद सुरु झाला आहे. परंतु, याचा मोठा फटका मात्र मुंबईकरांना सहन करावा लागला.

सिग्नल बिघाड आणि ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल सेवा विस्कळीत

सोमवारी वादळामुळे संध्याकाळच्या सुमारास सिग्नल बिघडल्याने आणि ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली होती. संध्याकाळच्या सुमारास स्थानकांवर आणि लोकलमध्ये प्रंचड गर्दी झाली होती. गर्दीमुळे डोंबिवली, कल्याण, पनवेल, वांद्रे, अंधेरी येथे लोकलमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाला. लोकलमधून पडून मृत्यू झालेल्या तिघांची अद्याप ओळख पटलेली नाही. त्या दिवशी लोकलची वाहतूक कोलमडल्याने सर्वच स्थानकावर लोकल पकडण्यासाठी थांबलेल्या प्रवाशांची गर्दी वाढली होती.

ठाणे स्थानकात लोकल पकडण्यासाठी झालेल्या गर्दीमुळे महिलांची चेंगराचेंगरी देखील झाली होती. हीच परिस्थिती परेल, दादर स्थानकात देखील होती. भांडूप स्थानकाजवळ सोमवारी संध्याकाळी लोकलमधून पडून एक महिला जखमी झाली होती. शहाड स्थानकात एक प्रवासी पडून जखमी झाला. जुईनगर आणि चर्चगेट स्थानकात देखील प्रत्येकी एक-एक प्रवासी जखमी झाला होता. याशिवाय बोरिवली स्थानकात महिलेचा बुरखा एस्केलेटरमध्ये अडकला होता. त्यामुळे महिला पडून जखमी झाली होती.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT