Gen Z viral news
मुंबई: "पगार कमी असला तरी चालू शकतं, पण स्वभिमानाशी तडजोड नाही," असा पवित्रा घेत मुंबईतील ध्रुपदी नावाच्या एका तरुणीने आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातील वाढता कामाचा ताण आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणारी अपमानास्पद वागणूक याविरोधात आता 'जेन-झी' पिढी उघडपणे आवाज उठवण्यास सुरुवात केल्याचे हे चित्र आहे.
ध्रुपदी मागील दोन वर्ष सात महिन्यांपासून एका नामांकित कंपनीत काम करत होती. आपल्या कामाच्या जोरावर तिने कंपनीत चांगली प्रतिमा निर्माण केली होती. मात्र, जेव्हा तिने अधिक वेळ केलेल्या कामाचा मोबदला मागितला, तेव्हा वाद पेटला. ध्रुपदीच्या म्हणण्यानुसार, तिने ओव्हरटाईमचे पैसे मागितले असता तिच्या वरिष्ठांनी इतर कर्मचाऱ्यांसमोर तिच्यावर ओरडून तिचा अपमान केला.
या प्रकारानंतर तिने वरिष्ठांकडून माफीची मागणी केली होती. मात्र, योग्य प्रतिसाद न मिळाल्याने तिने तात्काळ राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. "मी राजीनामा दिला याचा मला आनंदच आहे," असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
'जेन-झी' म्हणजेच आजची तरुण पिढी जुन्या पिढीच्या तुलनेत कामाच्या ठिकाणी होणारा अपमान, मानसिक छळ आणि विनामोबदला राबवून घेण्याच्या वृत्तीला विरोध करत असल्याचे चित्र आहे. "आमची पिढी परिपूर्ण नसेलही, पण केवळ इतरांची पसंती मिळवण्यासाठी आम्ही आमच्या सन्मानाचा बळी देण्यास तयार नाही," अशा शब्दांत ध्रुपदीने आजच्या तरुणाईची मानसिकता मांडली.
ध्रुपदीच्या या धाडसी निर्णयाचे नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. भारतात खासगी कार्यालयांमध्ये शिस्तीच्या नावाखाली कर्मचाऱ्यांचा अपमान करणे किंवा विनामोबदला ओव्हरटाईम करून घेणे हे जणू सामान्य मानले जाते, अशा भावना अनेक युजर्सनी व्यक्त केल्या. दुसरीकडे, काहींनी मात्र असे प्रश्न उपस्थित केले आहेत की, अशा प्रकारे सोशल मीडियावर राजीनाम्याचे प्रदर्शन केल्याने प्रश्न सुटतात की केवळ इंटरनेटवर संतापाचे वातावरण निर्माण होते?