Mumbai Tiranga Rally Pudhari
मुंबई

Gen Z Shivaji Park Political Rally: शिवाजी पार्कवर ‘इन्स्टा’ जनरेशनचा राजकीय कल्ला

राजकीय पक्षांच्या नेहमीच्या घोषणांना सरावलेल्या या परिसराने रविवारी इन्स्टा जनरेशनच्या टोकदार प्रश्नांचे फलक, त्यांचे सळसळते चैतन्य अनुभवले.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: एरवी शिवाजी पार्कचा परिसर हा तरुणाईसाठी 'हँग आऊट'चे हॅपनिंग ठिकाण. रविवारी सकाळी मात्र हा परिसर 'जेन झी'च्या राजकीय भूमिकेचा मंच बनला होता.

राजकीय पक्षांच्या नेहमीच्या घोषणांना सरावलेल्या या परिसराने रविवारी इन्स्टा जनरेशनच्या टोकदार प्रश्नांचे फलक, त्यांचे सळसळते चैतन्य अनुभवले. मोबाईलचा कॅमेरा आणि त्यातून अपलोड होणारे सेल्फी आणि रिल्स् म्हणजे 'जेन झी'ची राजकीय 'स्टेटमेंट' बनले.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेला राजीनामा, केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करत घेतलेली माघार या पार्श्चभूमीवर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने विजय जल्लोष सभेची हाक दिली. सकाळी दहा वाजता जमण्याचा निरोप होता. मात्र, साडेनऊ वाजताच शिवाजी पार्कचा परिसर युवा वर्गाने व्यापून टाकला.

जेन झी, पालक वर्ग, सर्वसामान्य मुंबईकरांची गर्दी नजरेत भरणारी होती. कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा खांद्यावर न घेता यायचे होते. येणाऱ्यांपैकी अनेकांच्या हातात तिरंगा होता. भारतमाता की जय... माँ तुझे सलाम... वंदे मातरम्‌... असा घोष सुरू होता. या जल्लोष रॅलीत वंदे मातरम्‌, भारत हम को जान से प्यारा हैं, लहरा दो लहरा दो, रंग दे बसंती... अशी गाणी वाजत होती आणि त्या तालावर तरुणाईची पावले थिरकत होती. टाळ्या, घोषणांचा पाऊस अखंड होता.

काहींच्या हाती तिरंगा, कुठे राज्यघटना, कुठे महात्मा फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रांचे फलक होते. राजकीय व्यवस्था उत्तरदायी व्हायला हवी, असा आग्रह व्यक्त होत होता.

तरुणाईच्या हातातील फलक कुठे थेट भिडणारा, तर कुठे व्यवस्थेची खिल्ली उडवत रोकडा प्रश्न करत होता. जल्लोष सभेची राष्ट्रगीताने सांगता झाल्यानंतरही पुढचे काही तास ही तरुणाई शिवाजी पार्क परिसरात रेंगाळत राहिली. गप्पांचे फड, फोटोसेशन लक्ष वेधून घेत होते.a

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT