मुंबई : मुलुंड पूर्व येथील गव्हाणपाडा येथील वासुदेव बळवंत फडके मार्गावरील संपूर्ण फूटपाथवर मासेविक्रेत्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदेशीरपणे कब्जा केल्याने पादचाऱ्यांसह स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. पालिकेकडे तक्रारी केल्यानंतर थातूरमातूर कारवाई केली जाते. त्यामुळे त्रस्त झालेल्या मनीषा सोसायटीने कारवाईसाठी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
गव्हाणपाडा येथील वासुदेव बळवंत फडके मार्गावर मनीषा को. ऑप. हाउसिंग सोसायटी असून त्यामध्ये ३५ फ्लॅटधारक आहेत. सोसायटीच्या समोरील फुटपाथवर गेल्या अनेक वर्षांपासून मासळी विक्रेत्यांनी बस्तान मांडल्याने मनस्ताप त्यांना होत आहे. संपूर्ण फुटपाथ त्यांनी व्यापला असल्याने रस्त्यावरून ये-जा करणे अवघड झाल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे सध्या ज्या फुटपाथवर मासळी विक्रेते बसत आहेत, त्याच्या समोरच मुलुंडचे माजी आमदार दिवंगत सरदार तारा सिंह यांनी सार्वजनिक निधीचा वापर करून येथे मासळी बाजार उभारला होता, जेणेकरून विक्रेत्यांना फूटपाथवरून स्थलांतरित करता येईल. मात्र, मासेविक्रेत्यांनी या बाजाराचा वापर गोदाम म्हणून केला आहे. तर विद्यमान आमदार मिहिर कोटेचा यांनी म्हाडा निधीतून मासळी बाजाराचे पुन्हा नूतनीकरण करून दिले. मात्र मासेविक्रेते बाजारात व्यवसाय न करता पुन्हा फुटपाथवर व्यवसाय करत आहेत.
रोड सेटबॅक क्षेत्रही बळकावले !
रस्ता रुंदीकरणासाठी मनीषा सोसायटीने पालिकेला रोड सेटबँक क्षेत्र दिले होते. परंतु हा भागदेखील मासेविक्रेत्यांच्या ताब्यात गेला आहे. यामुळे त्रस्त होऊन मनीषा सोसायटीने मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. याचिका दाखल झाल्याचे पालिकेला कळताच पालिकेने या मासळी बाजारा विरोधात कारवाईची मोहीम हाती घेतल्याचे समजते.