Forbes 2026 Pudhari
मुंबई

Forbes 2026: मुकेश अंबानींना मागे टाकत गौतम अदानी भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती; एकूण संपत्ती किती?

आशियाच्या श्रीमंतांच्या यादीत मोठा फेरबदल!

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: भारतीय उद्योग जगतात आणि आशियाई बाजारात श्रीमंतांच्या क्रमवारीत मोठी उलथापालथ झाली आहे. अब्जाधीश गौतम अदानी यांनी पुन्हा एकदा पेट्रोकेमिकल क्षेत्रातील दिग्गज मुकेश अंबानी यांना मागे सारून भारताचे सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा बहुमान मिळवला आहे.

गेल्या काही महिन्यांत या दोन्ही उद्योगपतींमध्ये अव्वल स्थानासाठी चुरस पाहायला मिळत आहे. ‘फोर्ब्स’ मासिकाच्या ताज्या आकडेवारीनुसार गौतम अदानी यांची एकूण संपत्ती ८९.३ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे, तर मुकेश अंबानी यांची संपत्ती ८८.१ अब्ज डॉलर आहे.

ही स्पर्धा आता केवळ भारतापुरती मर्यादित राहिलेली नाही. जपानच्या ‘सॉफ्टबँक’चे संस्थापक मसायोशी सोन यांनी या दोन्ही भारतीय दिग्गजांना जोरदार आव्हान दिले आहे. जागतिक स्तरावर आलेल्या ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’च्या लाटेमुळे मसायोशी सोन यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे.

काही दिवसांपूर्वी जपानच्या शेअर बाजारात (निकेई २२५) झालेल्या अभूतपूर्व वाढीमुळे सोन यांनी काही काळासाठी अदानी आणि अंबानी दोघांनाही मागे टाकत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान मिळवला होता. त्यावेळी त्यांची संपत्ती १०० अब्ज डॉलरवर गेली होती. या तेजीमुळे सॉफ्टबँकने टोयोटा कंपनीला मागे टाकत जपानमधील सर्वात मौल्यवान कंपनी बनण्याचा मान मिळवला.

गौतम अदानी यांच्या संपत्तीत झालेल्या वाढीमागे त्यांच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेली सुधारणा हे मुख्य कारण आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने अदानी यांच्यावरील फसवणुकीचे आरोप मागे घेण्याचे संकेत दिल्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे. तसेच 'अदानी ग्रीन एनर्जी'ने गुजरातच्या कच्छ वाळवंटातील खावडा येथे ५० मेगावॉटचा सौरऊर्जा प्रकल्प सुरू केल्याने त्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी आली आहे.

दुसरीकडे, मुकेश अंबानी यांच्या 'रिलायन्स इंडस्ट्रीज'ला मात्र गेल्या सहा महिन्यांत काही अंशी फटका बसला आहे. मध्य पूर्वेतील भू-राजकीय तणाव आणि वाढलेल्या मालवाहतूक खर्चामुळे रिलायन्सच्या ऊर्जा व्यवसायावर दबाव निर्माण झाला आहे, ज्यामुळे त्यांच्या शेअर्समध्ये सुमारे १६ टक्क्यांची घसरण झाली आहे. शेअर बाजारातील या सततच्या चढ-उतारामुळे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा हा किताब आगामी काळात कोणाकडे जातो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT