मुंबई : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून त्याचे पडसाद बुधवारी विधानसभेच्या कामकाजावर उमटले. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी याप्रश्नी राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी आग्रही मागणी केली. त्यावर, हा प्रश्न केंद्र सरकारशी संबंधित असला तरी राज्य सरकारने योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशा सूचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केल्या.
राज्यातील गॅस तुटवड्याबाबत काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी नियमित कामकाज सुरू झाल्याबरोबरच औचित्याचा प्रश्न उपस्थित केला. राज्यात सध्या घरगुती गॅसचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, सर्वसामान्य गृहिणींमध्ये भीती आणि अस्वस्थतेचे वातावरण आहे.
एकीकडे सरकार विकासाच्या गप्पा मारत असताना दुसरीकडे जनतेला आपली चूल कशी पेटवायची, याची चिंता सतावत आहे. अमेरिका - इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात गॅस टंचाई जाणवत आहे, तुटवड्यामुळे मुंबई आणि नागपूर या शहरांमध्ये 30 टक्के हॉटेल बंद झाले आहेत, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
गॅसच्या तुटवड्यामुळे काळाबाजार वाढण्याची भीती असून, काल 18 लाख रुपयांच्या सिलिंडरची गाडी चोरीला जाण्याची घटना घडली आहे. ही कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने भयावह स्थिती आहे. गॅस टंचाईच्या निषेधार्थ कोल्हापूर आणि विदर्भासह राज्यभरात आंदोलने सुरू झाली आहेत.
त्यामुळे सरकारने या गंभीर परिस्थितीवर तात्काळ आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. त्यावर, हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत असला तरी राज्य सरकारने आवश्यक उपाययोजना कराव्यात अशा सूचना विधानसभा अध्यक्षांनी दिल्या.