Gargai Water Supply Project Pudhari
मुंबई

Gargai Water Supply Project: मुंबईकरांसाठी पाण्याची चिंता कमी होणार? गारगाई प्रकल्प जानेवारी २०२७ पर्यंत सुरू होण्याची शक्यता

केंद्र-राज्य सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या गारगाई पाणीपुरवठा प्रकल्पाला आता चालना मिळेल असे वाटत होते. परंतु अद्यापपर्यंत दोन परवानग्या येणे बाकी असून या परवानगी येणाऱ्या दोन महिन्यात अपेक्षित आहे. त्यामुळे हा प्रकल्प जानेवारी २०२७ पर्यंत जनसेवेत दाखल होईल, असा विश्वास पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

गारगाई पाणीपुरवठा प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये गारगाई नदीवर ६९ मीटर उंचीचे व ९७९.४ मीटर लांबीचे धरण बांधण्यात येणार आहे.

त्यानंतर या धरणातील पाणी मुंबईत आणण्यासाठी १.६ किमी लांबीचा बोगदा बांधण्यासह अन्य पायाभूत सुविधाही उभारल्या जाणार आहेत. या प्रस्तावाला एप्रिल २०२६ मध्येच मंजुरी देण्यात आली. त्यामुळे प्रकल्पाचे भूमिपूजन मे २०२६ मध्ये होण्याची शक्यता होती.

परंतु या प्रकल्पासाठी लागणाऱ्या सरकारच्या परवानगी मिळालेल्या नाहीत. यात राज्य व केंद्रीय वन मंत्रालयाची आणि केंद्रीय वन्यजीव महामंडळाची परवानगी मिळणे बाकी आहे. त्यामुळे प्रकल्पासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करूनही अद्यापपर्यंत कामाची सुरुवात झालेली नाही.

गारगाई प्रकल्पाचे भूमिपूजन कधी, याबाबत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांना विचारले असता, केंद्र सरकारच्या उर्वरित दोन परवानगी मिळाल्यानंतर या कामाचा प्रारंभ केला जाईल. या परवानगी दोन महिन्यात मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे याच वर्षी या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्याचा प्रशासनाचा विचार आहे.

परंतु ते शक्य न झाल्यास जानेवारी २०२७ मध्ये या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येईल. परवानगी मिळाल्यानंतर तातडीने काम सुरू करून ते २४ महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आल्याचेही बांगर यांनी सांगितले.

गारगाई पाणीपुरवठा प्रकल्पातून मुंबई शहराला दररोज सुमारे ४४० दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे. त्यामुळे मुंबईला दररोज पुरवठा होणाऱ्या पाण्यामध्ये वाढ होऊन, मुंबईकरांना दररोज सरासरी ४,४०० दशलक्ष लिटर इतके पाणी उपलब्ध होईल. त्यामुळे मुंबईकरांना अतिरिक्त पाणी मिळणार आहे.

असा होणार खर्च

  • धरणाचे बांधकाम - १७७६ कोटी

  • जल बोगदा - ४०० कोटी

  • प्रकल्पग्रस्त पुनर्वसन - १३३ कोटी

  • वृक्ष प्रत्यारोपण - २३३ कोटी

  • दोन वर्ष परिरक्षण - ६१३ कोटी

  • अन्य कामे - १२० कोटी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT