मुंबई : मुंबईतील मोठ्या गणपतीच्या विसर्जनाचा तिढा सुटला नसला तरी, मुंबई महानगरपालिकेने गिरगाव चौपाटीवर बाप्पाचे विसर्जन होणार हे गृहीत धरून येथील विसर्जनाची जय्यत तयारी सुरू केली आहे. विसर्जनाच्या काळात चौपाटी स्वच्छ ठेवण्यासाठी विविध सामाजिक संस्थांची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी अर्जही मागवण्यात आले आहेत.
पीओपी गणेश मुर्तींचे समुद्र व नैसर्गिक तलावात विसर्जन करण्यात हायकोर्टाची बंदी आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून पर्यायी व्यवस्था शोधली जात आहे. परंतु मोठ्या गणेश मुर्त्यांचे समुद्राशिवाय विसर्जन करणे शक्य नाही. त्यामुळे महापालिकेने पीओपी मुर्त्यांच्या विसर्जनाचा तिढा सुटला नसला तरी, सर्वाधिक गणेश मूर्तींचे विसर्जन होणार्या गिरगाव चौपाटीवर विसर्जनाची तयारी सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी गिरगाव चौपाटीवरील विसर्जनाच्या तयारीसाठी समुद्राच्या रेतीमध्ये गणेश मुर्त्यांच्या गाड्या फसू नये यासाठी पुरेशा मनुष्यबळासह स्टील प्लेटस टाकणे आणि काढण्यासाठी हायड्रा आणि वेल्डिंग मशीनची तरतूद आणि डोझर, विबरो रोलर आणि जेसीबीचा पुरवठा करणे, विसर्जनाच्यावेळी समुद्रात बुडणार्या भक्तांना वाचवण्यासाठी लाईफगार्डससह मोटारबोटसाठी विविध प्रक्रिया राबवण्यात आली होती.
आता गणेश विसर्जनाच्या वेळी गिरगाव चौपाटी व आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहावा यासाठी विविध खाजगी सामाजिक संस्था व बेरोजगार संस्थांची नियुक्ती करण्यात येणार आहे. हे काम संस्थांकडे सोपवण्यासाठी संस्थांची पात्रता यादी तयार करण्यात येणार आहे. यासाठी संस्थांकडून अर्ज मागविण्यात आल्याचे पालिकेचे एका वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितले. त्यामुळे मोठ्या गणेश मुर्त्यांचे विसर्जन समुद्रातच होणार हे निश्चित झाले आहे.
गिरगाव चौपाटीवर फुलाच्या सजावटीसह व्हीआयपी, कॉनस्यूलेटस आणि पालिका कर्मचार्यांसाठी आसन व्यवस्थेसह (फर्निचर) माईल्ड स्टील स्ट्रक्चरमध्ये डेकोरेटिव्ह वॉटरप्रूफ शामियाना आणि एनजीओ, व पालिकेसाठी वॉच टॉवर आणि अतिरिक्त पंडालची उभारणी. गिरगाव चौपाटी येथे परदेशी पाहुण्यांसाठी आसन व्यवस्थेसह (फर्निचर) माईल्ड स्टील स्ट्रक्चरमध्ये डेकोरेटिव्ह वॉटरप्रूफ शामियाना उभारणी आणि सुखसागर, कॅफे आयडियल येथे टीव्ही जर्नलिस्ट करीता पंडाल उभारणी आणि विविध ठिकाणी स्टील बॅरीकेडींग उभारण्याच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे लवकरात कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार आहे.