नवी मुंबई : राजेंद्र पाटील
लग्नसराई, दिवाळी, पाडव्यापेक्षाही यावर्षीच्या गणेशोत्सवात गणपतीसाठी सोन्याचे अलंकार खरेदीला मुंबईत मोठी मागणी आहे. गणेशोत्सवाच्या पाच दिवस आधीच आठवडाभरात 1500 कोटींची उलाढाल झाली आहे. तर आता गणेश चतुर्थी ते विसर्जनापर्यंत म्हणजे पुढील दहा दिवसांत आणखी 2 हजार कोटींची म्हणजे एकूण 3500 कोटींची उलाढाल यावेळी मुंबई सराफ बाजारात होईल, अशी माहिती इंडिया बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते कुमार जैन यांनी पुढारीशी बोलताना दिली.
गणेशोत्सवासाठी आणि नवसाच्या गणपतीचे नवस फेडण्यासाठी वेगवेगळ्या डिझाईनचे सोन्याचे अलंकार खरेदी करण्यात आले. यावेळी अंदाजे 125 टनाहून अधिक सोन्याची विक्री गणेशोत्सवात होईल, असा अंदाज सराफ बाजारातील व्यापार्यांनी व्यक्त केला आहे. मोदक, गणपती मूर्ती, साखळी, कानातील बाळी आणि हनुमानाची गदा या अलंकारांना वाढती मागणी असल्याचे कुमार जैन यांनी सांगितले.
गेल्या वर्षी गणेशोत्सवात सोन्याचे दर 85 हजार रुपये होता. त्यावेळी 80 टन सोन्याची विक्री झाली होती. यंदा गणेशोत्सवात हाच दर जीएसटीसह 1 लाखाच्या ही पुढे आहे. तरीही मागणी वाढली असल्याचे कुमार जैन यांनी स्पष्ट केले. पादुका, हार, उंदीर, मोदक आणि जास्वंदाची फुले, कानातील बाळी या वस्तूंना सर्वाधिक मागणी आहे.
नवस फेडणार्या गणेशभक्तांनी एक तोळ्यापासून 15 तोळ्यांपर्यंतचे सोन्याचे हार, पादुकापत्रा, 15 ग्रॅमपासून 25 ग्रॅमपर्यंत सोन्याचा मोदक, उंदीर आणि फुलांची खरेदी केली. दररोज 200 ते 225 कोटींची अलंकारांची विक्री मुंबई सराफ बाजारात सुरू आहे.
80 ते 90 किलोपर्यंत सोन्याचा पत्र्याचा वापर करून पादुका तयार करण्यात आल्या. मोदक, उंदीर कमी वजनाचे असल्याने त्यांची संख्याही मोठी आहे. एका दुकानातून साधारणत: 150 उंदीर तर तितक्याच मोदकांची विक्री झाली. तर सोन्याचे मोठे हार हे किमान 150 हून अधिक आहेत. यामुळे सराफ बाजाराला गणेशोत्सवात झळाळी आल्याचे जैन यांनी सांगितले. तर झवेरी बाजारात एका दुकानातून किमान 15 ते 25 हारांची, पादुकांची विक्री झाल्याचे सांगण्यात आले.