मुंबई : एकेकाळी चित्रपट निर्मात्यांकडून खंडणी वसूल करणे, चित्रपटांच्या आर्थिक व्यवहारांत हस्तक्षेप करणे आणि मागण्या मान्य न करणाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देणे, अशा प्रकारांमुळे मुंबईच्या चित्रपटसृष्टीला अंडरवर्ल्डच्या दहशतीचा सामना करावा लागला होता. आता अभिनेता सलमान खानला मिळणाऱ्या धमक्या, दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानाबाहेर झालेला गोळीबार आणि अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर जुहू येथे झालेल्या गोळीबारामुळे बॉलीवूडच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या घटनांमध्ये लॉरेन्स बिष्णोई टोळीचे नाव चर्चेत आले आहे. या घटनांमुळे अंडरवर्ल्डचे पुनरागमन होत आहे की, प्रसिद्ध व्यक्तींना लक्ष्य करून दहशत आणि वर्चस्व निर्माण करण्याचा नवा खेळ सुरू आहे, हा प्रश्न पोलिसांना पडला आहे. १९९० च्या दशकात दाऊद इब्राहिम व छोटा राजन यांच्यासारख्या गुन्हेगार टोळ्यांचा प्रभाव गुन्हेगारी विश्वात होता. चित्रपट निर्मात्यांकडून खंडणी मागणे, चित्रपटांचा वित्तपुरवठा व वितरणात हस्तक्षेप करणे, विरोध करणाऱ्यांना धमकावणे, असे प्रकार तेव्हा समोर आले. त्यावेळी दाऊदचा हस्तक अबू सालेम याचा दबदबा होता.
गोळीबारांच्या घटनांनी चिंता
एप्रिल २०२४ मध्ये सलमान खानच्या वांद्रेतील निवासस्थानाबाहेर गोळीबार झाला. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोका) कारवाई केली. लॉरेन्स बिष्णोई आणि अनमोल बिष्णोई यांची नावेही पुढे आली. १ फेब्रुवारी २०२६ रोजी दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या जुहू येथील निवासस्थानाबाहेर गोळीबार झाला. १८ ऑक्टोबर रोजी जुहू परिसरात टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाला. टायगर सुरक्षित राहिला. मात्र त्याचा चालक आणि अन्य एकजण जखमी झाला आहे.
धमक्यांमागे खंडणी की वर्चस्वाची लढाई?
प्रसिद्ध व्यक्तीवर हल्ला होण्याच्या घटनांमागे तीन शक्यता तपासणे महत्त्वाचे आहे. पहिली म्हणजे, खंडणी किंवा आर्थिक लाभासाठी धमक्या दिल्या जात आहेत का? दुसरी म्हणजे प्रतिस्पर्धी टोळ्यांवर दबाव निर्माण करण्यासाठी व आपले वर्चस्व दाखविण्यासाठी हल्ले केले जात आहेत का? तिसरी म्हणजे, वैयक्तिक वैर किंवा अन्य कारणातून हल्ले होत आहेत का? प्रत्येक प्रकरणातील पुरावे, आरोपींचे संबंध आणि हल्ल्यामागील उद्देश यावरूनच याचे उत्तर मिळू शकते.