Private Travels Fare Hike Pudhari
मुंबई

Ganeshotsav Private Travel Fare: खासगी बसचालकांकडून कोकण प्रवाशांची लूट

मुंबई-सावंतवाडी ३ ते ५ हजार, तर मुंबई-कणकवली २ ते ३ हजार रुपये भाडे

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: गणपतीसाठी गावी जाणाऱ्यांना रेल्वे गाड्यांची किंवा शासनाच्या एसटी बसेसची तिकिटे मिळत नसल्यामुळे त्यांची धाव खासगी ट्रॅव्हलकडे सुरू आहे. परंतु ऐन हंगामात कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्र जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सकडून अवाच्या सव्वा भाडे आकारत चाकरमान्यांची अक्षरशः लूट सुरू आहे. कुटुंबासह जास्तीचे पैसे आकारून खासगी ट्रॅव्हल्सने जाणे कठीण असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दरवर्षी गणपतीसाठी मुंबईतून साधारण १२ ते १३ लाख चाकरमानी गावी जात असतात. दिवसेंदिवस गणपतीला जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे येथेही गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची वाढती गर्दी लक्षात घेता खासगी ट्रॅव्हल्सकडून लूट सुरू आहे.

एरवी मुंबईहून कुडाळ,सावंतवाडी येथे जाण्यासाठी ३०० ते ६०० रुपये खासगी ट्रॅव्हल्स बसचे तिकीट असते. तसेच कोल्हापुरात जाण्यासाठी ८०० ते १००० रुपये तिकीट असते. परंतु गणपतीमध्ये शनिवार आणि रविवारी हीच तिकिटे ३ ते ४ हजाराने विकली जात होती. मात्र प्रवाशांनी तक्रारी करूनही या मनमानी कारभारावर आरटीओ अधिकाऱ्यांकडून कारवाई केली जात नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

वर्षभरात ५ ते ८ वेळा मुंबईहून कोकणात जाणारे दशरथ वाजवे हे खार ते सावंतवाडीसाठी ५०० ते ७०० रुपयांचे खासगी ट्रॅव्हल्सचे तिकीट काढतात. मात्र १२ तारखेला हेच तिकीट त्यांना ३५०० रुपयांना देण्यात आले. शिरीष शिरसाट हे कणकवली येथे दर दोन महिन्यांनी ५५० ते ६५० रुपयांच्या तिकिटात ट्रॅव्हल बसने मालाडवरून कणकवली येथे जातात.

मात्र आज ते ४२०० रुपयांचे तिकीट काढून जात असल्याचे त्यांनी सांगितले. प्रवाशांची अक्षरशः ही लूट आहे. हंगामात एसटी तिकिटाच्या दीडपट दरवाढ करण्याची खासगी ट्रॅव्हल्स बसला मंजुरी आहे. मात्र प्रत्यक्षात तिकीट दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

१२-१३ सप्टेंबर रोजीचे भाडे

मुंबई-सावंतवाडी - ३ ते ५ हजार

मुंबई-कुडाळ - ३ ते ४ हजार

मुंबई-कणकवली - ३ ते ३५०० हजार

मुंबई-कोल्हापूर - ३ ते ४००० हजार

मुंबई-सांगली - २२०० ते ३५०० हजार

मुंबई-सातारा - २००० ते ३५०० हजार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT