मुंबई : परळच्या कृष्णनगरचा राजा शुक्रवारी वाजत-गाजत निघालेल्या मिरवणुकीने आपल्या मंडपात दाखल झाला. अशा आगमन सोहळ्यांनी मुंबई स्वातंत्र्यदिनी दुमदुमून गेली.  pudhari photo
मुंबई

Ganeshotsav festival grants : गणेशोत्सव महोत्सवात मंडळांना रोषणाई अनुदान

भजनी मंडळांना साहित्य वाटप, अनुदानासह गणेश मंडळाच्या आँनलाइन दर्शनाची व्यवस्थाही उभारली जाणार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पारंपारिक गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यासाठी 11 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या अंतर्गत पर्यावरणपूरक तसेच सामाजिक उपक्रमांसाठी गणेश मंडळांना तालुका ते राज्य स्तरावर विविध पारितोषकांची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय, भजनी मंडळांना साहित्य वाटप, अनुदानासह गणेश मंडळाच्या आँनलाइन दर्शनाची व्यवस्थाही उभारली जाणार आहे. तसेच, विद्युत रोषणाई आणि सुशोभीकरणासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.

सांस्कृतिक विभागाने गणेशोत्सवाच्या राज्य महोत्सवासाठी विस्तृत शासन निर्णय जारी केला आहे. यात गणेशोत्सव मंडळे व घरगुती गणेश आरास स्पर्धा, चौकाचौकात रोषणाई, ड्रोन शो, विविध सांस्कृतिक कार्यक्रम आदींचा समावेश करण्यात आला आहे. धार्मिक प्रथा परंपरासह पर्यावरणपूरक आणि सामाजिक उपक्रमात काम करणार्‍या गणेशोत्सव मंडळांना तालुका ते राज्य स्तरापर्यंत पारितोषिके दिली जाणार आहेत. तसेच गिरगाव चौपाटीवर ड्रोन महोत्सव आयोजन केले जाणार आहे.

पुणे, नाशिक, नागपूर, मुंबई आणि राज्यभरात स्थानिक स्तरावर शक्य असेल त्या सार्वजनिक ठिकाणी रोषणाई करण्यात येणार आहे. यावर्षीपासून घरबसल्या नागरिकांना गणरायांचे दर्शन व्हावे यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात येत आहे. गणेशोत्सव काळामध्ये भजनी मंडळांना भजनामधील साहित्यासाठी थेट लाखो रुपयांचे अनुदान देण्याची योजना घोषित झाली आहे. परदेशातही गणरायाचे आगमन धुमधडाक्यात व्हावे, म्हणून हा राज्य महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा, ही भूमिका घेण्यात आली आहे.

याबाबत मंत्री शेलार म्हणाले की, जगात आणि देशात आपल्या गणेशोत्सवाची ओळख सर्वात मोठा महोत्सव म्हणून झालेली आहे. या महोत्सवातील स्पर्धा आणि विविध कार्यक्रमांचे पु. ल. देशपांडे कला अकदामी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे नियोजन व समन्वय करण्यात येणार आहे. लवकरच राज्य महोत्सवाच्या लोगोचे अनावरण करण्यात येणार आहे. तसेच ठिकठिकाणी व्याख्यानमाला, अध्यात्म नाट्यरंग महोत्सव, गणपतीविषयक रिल्स स्पर्धा, ड्रोन शो, राज्यस्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच, गणेशोत्सवावर आधारित टपाल तिकीट आणि नाणे काढण्यात येईल.

संपूर्ण राज्यभर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. महाराष्ट्राची कला व संस्कृती आणि परंपरेचे दर्शन या कार्यक्रमांतून घडेल. महाराष्ट्रासह जगभरात जिथे मराठी भाषिकांची मोठी वस्ती असेल तिथे सांस्कृतिक कार्यक्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.

  • राज्यातील महत्त्वाची मंदीरे आणि सर्वजनिक गणेशोत्सवाचे देखावे यांचे ऑनलाइन दर्शनासाठी पोर्टल निर्माण करण्यात येईल.

  • उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळ अंतर्गत तालुका स्तरावर स्पर्धेद्वारे विविध पारितोषिके देण्यात येतील.

  • घरगुती गणेशोत्सव आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचे फोटो व्हिडिओ क्लिप्स पोर्टलवर येण्यासाठी एक प्लॅटफॉर्म विकसित करण्यात येईल.

  • ज्या चित्रपटांमधून गणपती विषयक परंपरा, कला संस्कृती दर्शवलेली आहे, अशा चित्रपटांचा विशेष गौरव करण्यात येईल.

  • उत्सवाच्या दरम्यान प्रमुख ठिकाणी विद्युत रोषणाई व सुशोभिकरण करणार.

  • पारंपारिक भजन व आरती सादर करणार्‍या भजनी मंडळांना साहित्य वाटप, अनुदान देणार.

  • विसर्जन सोहळ्यामध्ये आंतरराज्यीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी विविध सोयी-सुविधा व वाहन व्यवस्था उपलब्ध करण्यात येणार.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT