नवी मुंबईत टांगा पलटी, घोडे फरार pudhari photo
मुंबई

Navi Mumbai municipal election results : नवी मुंबईत टांगा पलटी, घोडे फरार

महापालिकेवर नाईकांची सत्ता, 65 जागांवर विजयी

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई : नवी मुंबईतील गणेश नाईक यांच्या गेल्या 25 वर्षांतील एकहाती सत्तेला सुरूंग लावण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांनी महापालिका निडणुकीत केला. मात्र, गणेश नाईकांनी महापालिकेवर आपले निर्विवाद वर्चस्व कायम ठेवत महापालिका पुन्हा ताब्यात घेतली. प्रचारादरम्यान गणेश नाईक व एकनाथ शिंदे यांच्यात आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. यात टांगा पलटी, घोडे फरार हे नाईकांचे वक्तव्य चांगलेच चर्चेत राहिले. निवडणुकीतनंतरही भाजपने एकनाथ शिंदे यांचे टांग्याला लटकलेले फलक लावत पुन्हा डिवचले आहे.

महापालिकेच्या 111 जागांपैकी 65 जागांवर भाजपने विजय मिळवला,तर शिवसेनेला 42 जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काका पुतण्यांना खातेही उघडता आले नाही. उबाठा दोन तर मनसेने एका जागेवर खाते उघडले आणि एका अपक्षाचा विजय झाला.

नवी मुंबई महापालिकेच्या 28 प्रभागांत 111 जागांसाठी 500 उमेदवार रिंगणात होते. गुरुवारी झालेल्या निवडणुकीत 57.15 टक्के मतदान झाले होते. यात भारतीय जनता पक्षाने 65 जागांवर बाजी मारत ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

या निवडणुकीत शिवसेनेला (शिंदेगट) फक्त 42 जागांवर विजय मिळवता आला असून त्यांनी काही प्रभागांमध्ये कडवी झुंज दिली. मात्र, भाजपच्या संघटित प्रचारयंत्रणा, प्रभावी नेतृत्व आणि विकासकेंद्रित अजेंड्यापुढे त्यांना बहुमत मिळवण्यात अपयश आले. शिवयुतीमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला (उबाठा) केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले, तर मनसेला 1 जागा मिळवण्यात यश आले आहे. तर एक अपक्ष उमेदवार निवडून आला. उर्वरित जागांवर कोणत्याही पक्षाला विशेष प्रभाव पाडता आलेला नाही.

या निवडणुकीतील निकालामुळे नवी मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा गणेश नाईक यांचे वर्चस्व अधोरेखित झाले आहे. मागील अनेक वर्षांपासून नवी मुंबईच्या विकास प्रक्रियेत त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली असून, शहराचा नियोजनबद्ध विकास, पायाभूत सुविधा, नागरी सुविधा, आरोग्य सेवा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते व वाहतूक व्यवस्थेवर त्यांनी नेहमीच भर दिला आहे. याच विकासकामांचा विश्वास मतदारांनी भाजपवर दाखवला असल्याचे निकालातून दिसून आलेे.

प्रचार काळात भाजपने ‌‘स्थिर नेतृत्व, सातत्यपूर्ण विकास आणि सक्षम प्रशासन‌’ या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले होते. यासोबतच केंद्र व राज्य सरकारशी असलेली सुसूत्रता, निधी उपलब्धतेची हमी आणि मोठ्या प्रकल्पांची गती हे मुद्दे भाजपसाठी निर्णायक ठरले. मतदारांनी देखील शहराच्या विकासासाठी मजबूत व स्थिर नेतृत्वाची गरज ओळखून भाजपला कौल दिला असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

दरम्यान, निवडणूक निकाल जाहीर होताच नवी मुंबईतील विविध भागांमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करत फटाके फोडले, पेढे वाटून आनंद व्यक्त केला. अनेक ठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात विजयाचा आनंद साजरा केला. लवकरच महापालिकेत महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष तसेच विविध विषय समित्यांच्या निवडीची प्रक्रिया सुरू होणार असून, भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने सर्व महत्त्वाच्या पदांवर पक्षाचे वर्चस्व राहण्याची शक्यता आहे.

भाजपच्या या दणदणीत यशानंतर आता नवी मुंबईकरांच्या अपेक्षा वाढल्या असून, पुढील पाच वर्षांत शहराचा सर्वांगीण आणि वेगवान विकास होईल, अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत. गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराला नवी दिशा, गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

हा विजय नवी मुंबईकरांचा

नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने मिळवलेला विजय हा खऱ्या अर्थाने नवी मुंबईकर जनतेचा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकसनशील विचारांचा सन्मान असल्याचे वन मंत्री नामदार गणेश नाईक यांनी निकालानंतर सांगितले. यासाठी पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचे परिश्रम कारणीभूत ठरले आहेत. नवी मुंबईच्या यापुढील विकासाचा नियोजनबद्ध आराखडा आखला असून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, त्या अनुषंगाने लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण देण्यात येईल, असेही नाईक म्हणाले. यासह पाणीप्रश्न, प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटीची घरे नियमीत करणे आणि पुनर्विकास मार्गी लावणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT