वाशी: राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती असताना धर्म आणि जातीच्या नावाने राजकारण सुरू असून, त्याचा ताप आता राज्यकर्त्यांना जाणवत आहे. राज्यात धर्म आणि जातीच्या मुद्द्यांवरून सुरू असलेले राजकारण तसेच विद्यार्थ्यांची आंदोलने यामुळे सत्ताधारी मंत्र्यांवर तणावाचे वातावरण आहे.
काही लोकांनी लावलेल्या आगी आता विझत नाहीत, अशी टीका नाईक यांनी कोणाचेही नाव न घेता केली आहे. नवी मुंबईतील ‘सुगंधी शहर अभियाना’अंतर्गत ‘अंगण दत्तक योजने’चा शुभारंभ नाईक यांच्या हस्ते झाला. या वेळी ते बोलत होते.
नाईक म्हणाले की, जाती- धर्मावरून राजकारण चालू आहे. याचा ताप आता राज्यकर्त्यांना होत आहे. काही लोकांनी लावलेल्या आगी आता विझत नाहीत. बाटलीतील भूत ज्यांनी बाहेर काढले, त्यांनीच ते पुन्हा आवरावे.
ज्यांच्यात ताकद नाही त्यांनी अशा प्रकारात पडू नये. हे भूत आता उलटसुलट फिरत आहे, असेही ते म्हणाले. तसेच, “ढोंग आणि सोंग" कायम आणता येत नाही. त्यासाठी वास्तववादी जीवन असायला हवे, असेही नाईक यांनी सांगितले.
नवी मुंबई शहराचा ‘इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट’ पूर्ण झाल्याशिवाय यूआरएस योजना किंवा अवाजवी एफएसआय लागू करता येणार नाही. तसा करण्याचा कोणी प्रयत्न केला तर नवी मुंबईच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी आहे. तसेच प्रसंगी रस्त्यावर उतरू, असा इशाराही गणेश नाईक यांनी दिला.