मुंबई : गणेशोत्सवानिमित्त एस.टी. महामंडळाने ७ ते २५ सप्टेंबर या कालावधीत मुंबई, ठाणे, पालघर आणि परिसरातील कोकणवासीयांसाठी ५ हजार २२० जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली.
आषाढी यात्रेसाठी एस.टी. महामंडळाने ५,२०० जादा बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या. त्याच धर्तीवर गणेशोत्सवासाठीही मोठ्या प्रमाणावर जादा बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
किमान ४० प्रवाशांच्या गटासाठी १० ऑगस्टपासून गट आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गट आरक्षणामध्ये महिला व ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत, तर अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के भाडे सवलत लागू राहणार आहे.
गणेशोत्सवानिमित्त ७ सप्टेंबरपासून मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातील प्रमुख बसस्थानकांतून या जादा बसेसचे संचालन करण्यात येणार आहे.
गणेशोत्सवाच्या काळात एस.टी.ची वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी सर्व प्रमुख बसस्थानके आणि बसथांब्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहतील. तसेच, कोकणातील प्रमुख महामार्गांवर आवश्यक त्या ठिकाणी वाहनदुरुस्ती पथके तैनात करण्यात येणार असून, प्रवाशांना सुरक्षित, जलद आणि अखंड सेवा देण्यासाठी सर्वतोपरी व्यवस्था करण्यात आली आहे, असेही सरनाईक यांनी सांगितले.