Ganesh Chaturthi : प्रसिद्धीसाठी गणेशोत्सवाच्या शुभेच्छांचा आधार Pudhari News Network
मुंबई

Ganesh Chaturthi : प्रसिद्धीसाठी गणेशोत्सवाच्या शुभेच्छांचा आधार

नवी मुंबई शहरातील चौक फुलले विनापरवाना बॅनर्सनी

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात गणेशोत्सव मंडळांनी रस्त्यांवर शुभेच्छा आणि स्वागताच्या कमानी उभारल्या आहेत. तर विनापरवाना बॅनरबाजी करणार्‍या राजकारण्यांनी चौकाचौकात शुभेच्छांचे अनधिकृत बॅनर उभारले आहेत. विशेष म्हणजे दिशादर्शक फलकावरही बॅनरबाजी करण्यात आली आहे. या अनधिकृत होर्डिंग्जमुळे शहराचे विद्रुपीकरण वाढले आहे.

उच्च न्यायलयाच्या आदेशानुसार अनाधिकृत बॅनरबाजी करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पण महापालिकेचे अधिकारी मात्र अनधिकृत बॅनरबाजी करणार्‍यांकडे कानाडोळा करत असल्याचे दिसून येत आहे . महानगरपालिका क्षेत्रात बॅनर लावण्यासाठी महापालिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे. पण नवी मुंबईतील राजकीय कार्यकर्ते महापालिकेची परवानगी न घेताच शहरभर अनधिकृत बॅनरबाजी करत आहेत. या अनाधिकृतपणे लावण्यात येत असलेल्या बॅनरमुळे शहर विदु्रप होत असून महापालिकेचा महसुलही बुडत आहे.

आगामी नवी मुंबई महापालिका निवडणूक बघता राजकीय नेत्यांनी गणेशोत्वाच्या निमित्ताने जोरदार बॅनरबाजी केली आहे. अनाधिकृत बॅनरबाजी करण्यामध्ये सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांचे हात आहेत. त्यामुळे सर्वपक्षीय नेते हे अनधिकृत बॅनरबाजीबद्दल ब्र शब्दही तोंडातून काढत नाहीत.

नवी मुंबईतील एखाद्या चौकातून जात असताना संपूर्ण चौकालाच बॅनरचा विळखा असल्याने नेमके कुठे जात आहोत याची विचारणा बाहेरुन आलेल्या नागरिकांना करावी लागत आहे. बॅनरबाजीमुळे शहराचे विदु्रपीकरण मोठया प्रमाणात होत असून महापालिका प्रशासन मात्र त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने परवानगी घेऊन प्रसिद्धी मिळवणारे मंडळ आणि सामाजिक कार्यकर्ते नाराजी व्यक्त करत आहेत. शहरात केलेली बॅनरबाजी ही वाहनचालकांचे लक्ष वेधून घेत असल्यामुळे छोटे मोठे अपघातही घडत असल्याचे दिसून येते.

बॅनरबाजी करणार्‍यांची अनोखी शक्कल

मंडळांचे कार्यकर्ते हे महापालिकेकडून बॅनर लावण्यासाठी परवानगी एका बॅनरची घेतात. प्रत्यक्षात दुप्पट बॅनर लावले जातात. याशिवाय बॅनरची छोट्या आकाराची परवानगी घेतली असताना मोठ्या आकराचे बॅर्नर लावून महापालिकेची फसवणूक करत असल्याचे निदर्शनास येते.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात अनाधिकृतपणे लावण्यात आलेले बॅनर काढण्याचे काम अतिक्रमण पथकांकडून करण्यात येत आहे.
डॉ.कैलास गायकवाड, अतिक्रमण उपायुक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT