मुंबई : सचिन बनछोडे
अथर्ववेदाचे एक उपनिषद असलेल्या गणपती अथर्वशीर्षामध्ये श्रीगणेशाचे वर्णन 'त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि' असे केलेले आहे. आत्मस्वरूप किंवा सर्वव्यापी ब्रह्मस्वरूप असे हे गणरायाचे अनंत रूप आहे. हा आदि-अंत रहित गणेश अर्थातच केवळ भारतापुरता मर्यादित नाही. या बुद्धी, विद्या, कलेच्या आणि विघ्न हरण करणाऱ्या तसेच अग्रपूजेचा मान असलेल्या देवतेची पूजा जगभरातील मूळ भारतीय तसेच अन्यही देशांच्या नागरिकांकडून केली जात असते. जगाच्या पाठीवर सर्वत्र दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची धूम दिसून येते. यावर्षीचा गणेशोत्सवही 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषात जगभर धुमधडाक्यात सुरू आहे. भारतातील पारंपरिक वाद्यांचा गजर, आकर्षक देखावे आणि सांस्कृतिक कार्यक्रम यासोबतच, यंदा डिजिटल माध्यमांमुळे गणेशोत्सवाचा उत्सव सीमारेषा ओलांडून जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे.
अमेरिका, कॅनडा, युके, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, दुबई अशा देशांमध्ये भारतीय समुदाय मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा करतो. विविध शहरांमध्ये सार्वजनिक मंडळे, मंदिरांमध्ये मूर्ती स्थापना, पारंपरिक पूजा, सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, संगीत आणि भजनांचे आयोजन केले जाते.
परदेशातील अनेक मंडळे ऑनलाईन आरती, कथा, कार्यशाळा आणि स्पर्धा आयोजित करत आहेत. व्हर्चुअल दर्शन, ऑनलाईन विसर्जन आणि सोशल मीडिया लाईव्ह स्ट्रिमिंगमुळे भारताबाहेर असलेल्या गणेशभक्तांनाही उत्सवात सहभागी होता येते. काही देशांमध्ये स्थानिक नागरिकही भारतीय मित्रांसोबत गणेशोत्सवात सहभागी होत आहेत. त्यामुळे हा उत्सव सांस्कृतिक आदान-प्रदानाचे माध्यम बनला आहे.
जर्मनीतील गणेश चतुर्थीच्या उत्साहाचे दृश्य यूट्यूबसारख्या सोशल मीडियावरही पाहायला मिळते. गणपती मिरवणुकीत नऊवारी साड्या नेसलेल्या महिला लेझीम खेळत असताना व पुरुष पारंपरिक वेशात ढोलवादन करीत असताना यामध्ये दिसून येतात. संपूर्ण जर्मनीमध्ये हा उत्सव साजरा होत असला, तरी 'इंडियन असोसिएशन ड्रेस्डेन'तर्फे ३० आणि ३१ ऑगस्ट रोजी हे ३५ वे वर्ष आहे. यंदाही ड्रेस्डेन शहरात एका सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत आणि नृत्याचा समावेश असेल.
लंडनच्या महाराष्ट्र मंडळाच्या गणेशोत्सवाचे मंडळातर्फे दहा दिवसांच्या गणेशोत्सवाचे आयोजन केले आहे. लंडनच्या हौन्स्लो मंडळाने गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. अमेरिकेतील सर्वात मोठा गणेशोत्सव कार्यक्रम न्यू जर्सीमधील वूडब्रिज सेंटर मॉल येथे आयोजित करण्यात आला आहे, जो २७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीत पार पडेल. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गच्या श्री राधेश्याम मंदिराकडूनही गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचा गणेशोत्सव हा केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक मर्यादित न राहता, डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने जागतिक स्तरावर एकात्मतेचे, आनंदाचे आणि भारतीय संस्कृतीच्या गौरवाचे प्रतीक ठरला आहे. भारतातील आणि परदेशातील गणेश भक्त एकत्र येऊन 'गणपती बाप्पा मोरया'चा गजर करत आहेत, हेच या उत्सवाचे खरे वैशिष्ट्य!