मुंबई : अकरावीच्या प्रवेशात तिसरी यादीही ‘90 प्लस’च्या घरात पोहोचली आहे. अनेक नामवंत महाविद्यालयांतील जागा ‘फुल्ल’ झाल्या आहेत. त्यामुळे अनेक महाविद्यालयांत चौथी यादी जाहीर होणारच नाही अशी स्थिती तयार झाली आहे. दुसर्या यादीपेक्षा तिसर्या यादीचे कटऑफ जैसे थे राहिल्याने अनेक विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे. पसंतीक्रमाच्या घोळामुळे अनेकांना या यादीतही प्रवेश न मिळाल्याच्या तक्रारी आहेत.
अकरावी ऑनलाइन केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची तिसरी गुणवत्ता यादी गुरुवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली. तिसर्या यादीत कट-ऑफ खाली येईल, या आशेवर असलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात मात्र अनेक विद्यार्थ्यांनी पसंतीक्रमात बदल केल्याने या यादीतही कटऑफ वाढल्याचे दिसून आले. नामांकित महाविद्यालयांची वाणिज्य शाखेची कट-ऑफ दुसर्या यादीपेक्षा वर गेल्याचे दिसून आले आहे तर काही महाविद्यालयांमधील जागा फुल्ल झाल्याचे चित्र दिसत आहे.
बहुतांश महाविद्यालयातच पहिल्या व दुसर्या यादीनंतर काही मोजक्या जागा शिल्लक होत्या त्याही या यादीत भरुन गेल्याचे प्राचार्य सांगतात. पहिली यादी 95वर पोहचली होती. दुसर्या यादीतही जवळपास तेच दिसून आले. नामांकित महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी रांगेत उभे असलेल्या विद्यार्थ्यांना आता अन्य महाविद्यालयात प्रवेशासाठी संधी पहावी लागणार आहे.
दुसर्या यादीत वाणिज्य शाखेसाठी झेविअर्समध्ये 89.2 टक्के कट-ऑफ पोहचला होता. तिसर्या यादीत झेविअर्समध्ये जागाच शिल्लक नाहीत, एचआर महाविद्यालयामध्ये दुसर्या यादीत 93.2 टक्क्यांना प्रवेश मिळाला होता. पण तिसर्या यादीत आता कट-ऑफ 98 टक्क्यांवर पोहोचला आहे.
पोदार महाविद्यालयात तिसर्या फेरीसाठी एकही जागा शिल्लक न राहिल्याने कट-ऑफ जाहीरच झाला नाही.एनएम महाविद्यालयाची दुसर्या यादीची कट-ऑफ 92 टक्के होती, तर तिसर्या यादीत ही टक्केवारी 94 टक्क्यांवर पोहोचली आहे. या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना 26 जुलै.5.00 वाजेपर्यंत मुदत असणार आहे.