Fyjc Admission 2025: अकरावी प्रवेशाची होणार आणखी एक विशेष फेरी  File Photo
मुंबई

Fyjc Admission 2025: अकरावी प्रवेशाची होणार आणखी एक विशेष फेरी

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर निर्णय; 6 ऑक्टोबरपर्यंत मुदत

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राज्यात अकरावी ऑनलाइन प्रवेशाची प्रक्रिया संपल्याचे जाहीर झाले असले, तरी राज्यातील पूर आणि अतिवृष्टीच्या पाश्वभूमीवर माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालयाने आणखी एक विशेष अंतिम फेरी जाहीर केली आहे. या फेरीत प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे. या फेरीसाठी अर्ज नोंदणी, अर्जाचा भाग-2 म्हणजेच प्राधान्यक्रम भरणे आदींसाठी 6 ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

अकरावीच्या दहा नियमित फेर्‍यांनंतर झालेल्या विशेष फेर्‍यांमध्ये अगदी शेवटच्या फेरीपर्यंत तब्बल 10 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नव्हता. अखेर संचालनालयाने 22 सप्टेंबर रोजी शेवटच्या फेरीची घोषणा करत त्यापुढे एकही फेरी होणार नसल्याचे स्पष्ट केले. शेवटच्या फेरीत कला शाखेतून 3 हजार 201, वाणिज्य शाखेत 2 हजार 636 आणि विज्ञान शाखेत 4 हजार 994 अशा एकूण 10 हजार 831 विद्यार्थ्यांना अलॉटमेंट देण्यात आले. या शेवटच्या फेरीत 9552 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यामधील काही विद्यार्थी अजूनही शिल्लक आहेत.

राज्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांसाठी इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची आणखी एक शेवटची संधी देण्यात यावी असा निर्णय विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर आणि शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या बैठकीत घेण्यात आला. यानंतर आता माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालयाने आणखी एक विशेष अंतिम फेरी जाहीर केली आहे.

विद्यार्थ्यांना अर्ज नोंदवणे, प्राधान्यक्रम भरणे आदींसाठी 6 ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तर गुणवत्ता यादी आणि प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेण्याच्या प्रक्रियेचे वेळापत्रक मंगळवार, 7 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे.

दहाव्या फेरीअखेरीस 13 लाख 42,438 प्रवेश

आतापर्यंत राज्यातील एकूण 9 हजार 544 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी तब्बल 14 लाख 88 हजार 569 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 13 लाख 43 हजार 969 विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग-1 आणि भाग-2 पूर्ण करून सहभाग नोंदवला. प्रवेशाच्या दहाव्या फेरी अखेरीस 13 लाख 42 हजार 438 विद्यार्थ्यांचे प्रवेश कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये निश्चित झाले आहेत. आता नोंदणी करुन अजूनही प्रवेश न घेतलेल्या तसेच नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना या फेरीत संधी असणार आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालयाने दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT