मुंबई : अकरावी प्रवेशाच्या दोन यादीतील प्रवेश झाल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालये सुरु होतात. अकरावीचे वर्ग सुरू झाल्यानंतर तब्बल तीन महिने झाले तरी प्रवेशप्रक्रिया सुरु राहते. ऐन दिवाळीच्या सुटीच्या अगोदर आणि सहामाही परीक्षेच्या तोंडावर प्रवेश प्रक्रिया सुरुच असते. उशीराने प्रवेश मिळालेल्या या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची जबाबदारी महाविद्यालयांकडून पूर्ण होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
यंदा जरी राज्यात ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया प्रथम राबवली गेली असली तरी मुंबईत अकरावीची प्रवेश प्रक्रिया गेली 14 वर्षे ऑनलाईन सुरु आहे. या प्रवेश प्रक्रियेत अनेक बदल केले. असे असूनही अकरावीची प्रवेश प्रक्रिया दरवर्षी चार ते पाच महिने चालूच असते.
यंदाही फेरी कमी केल्या असल्या तरी गणपतीनंतरही आता तिसरी प्रवेश फेरी शिल्लक विद्यार्थ्यांसाठी घ्यावी लागत आहे. अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतून अद्याप महाविद्यालय न मिळालेल्या विद्यार्थ्यासाठी आता शेवटची फेरी राबवली जाणार आहे. 22 ते 25 सप्टेंबर दरम्यान संबंधित फेरी राबविण्यात येणार आहे. राज्यात अकरावी प्रवेशासाठी आत्तापर्यंत तब्बल 13 लाखांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून प्रवेशासाठी अद्यापही सव्वाआठ लाखांवर जागा रिक्तच राहिल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अकरावी प्रवेशासाठी राज्यात 9 हजार 548 महाविद्यालयांमध्ये 18 लाख 23 हजार 960 जागा कॅप प्रवेशाच्या तसेच 3 लाख 45 हजार 697 जागा कोटा प्रवेशाच्या अशा एकूण 21 लाख 69 हजार 657 जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी 14 लाख 85 हजार 686 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 11 लाख 65 हजार 111 विद्यार्थ्यांनी कॅपमधून तर 1 लाख 68 हजार 782 विद्यार्थ्यांनी कोटाअंतर्गत अशा 13 लाख 33 हजार 893 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
आता प्रवेशासाठी अद्यापही 6 लाख 58 हजार 849 जागा कॅप प्रवेशाच्या तसेच 1 लाख 76 हजार 915 जागा कोटा प्रवेशाच्या अशा एकूण 8 लाख 35 हजार 764 जागा प्रवेशासाठी उपलब्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
अकरावी प्रवेशासाठी अनेक फेर्या राबवूनही विद्यार्थी प्रवेशाकडे पाठ फिरवत आहेत. त्यामुळे वारंवार फेर्या राबवून देखील यंदा अकरावीच्या तब्बल सव्वाआठ लाखांहून अधिक बाके रिकामीच राहणार आहेत; परंतु तरीदेखील सुरू असलेले प्रवेश प्रक्रियेचे गुर्हाळ नेमके कधी संपणार आहे? असा प्रश्न आता उपस्थित करण्यात आला आहे.
जे विद्यार्थी उशिरा प्रवेश घेतात त्यांचे नियोजन कसे करायचे. प्रवेश प्रक्रियेतील वेळापत्रकाच्या मर्यादा नसल्याने महाविद्यालयांनी नाराजी व्यक्त केली. वारंवार वाढत जात असलेल्या फेरीमुळे शैक्षणिक वर्ग चालवताना अडचणी येतात. त्यामुळे जून मध्ये होणार्या प्रवेशाचे नियोजन जानेवारीपासूनच शालेय शिक्षण विभागाने करण्याची गरज आहे. किंवा यासंदर्भात अनेक उपाययोजना अंमलात आणण्याची गरज असल्याचे मत प्राचार्यांनी व्यक्त केले.
आता प्रवेश होत असलेल्या या विद्यार्थ्यांच्या आता प्रात्यक्षिक परीक्षा, प्रकल्प सादर करणे, याद्वारे मूल्यमापन करण्यात येते. तसेच काही ठिकाणी पर्यायी प्रश्नांच्या आधारे परीक्षा घेतल्या जातात. आता या कशा प्रकारे पूर्ण केल्या जाणार याबाबत प्रश्नचिन्ह असल्याचेही महाविद्यालयांकडून सांगण्यात आले. प्रवेश दिला म्हणजे शालेय शिक्षण विभागाचे काम झाले. मात्र त्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी तसे नियोजन करावे लागते यामुळे प्रवेशासंदर्भात कटऑफ डेट ठरवा, अशी मागणीही आता महाविद्यालयांकडून होत आहे.
प्रत्येक विद्यार्थ्यांला प्रवेश द्यायचा असल्याने तब्बल पाच महिने प्रवेश प्रक्रिया चालू असते.
तीन महिने वर्गात अभ्यासक्रम झालेला असतानाही प्रवेश प्रक्रिया सुरुच असते.
प्रवेशाचे मार्गदर्शन पालक व विद्यार्थ्यांना नसल्याने अनेक विद्यार्थी अर्ज भरत नाहीत.
प्रत्येक वर्षी नवीन पालक आणि नवीन विद्यार्थी असूनही अधिकारी वर्गाचे दुर्लक्ष, माहिती अभावी अनेक विद्यार्थी गोंधळात असतात.
महाविद्यालयांची नोंदणी प्रक्रिया उशिरा होते. यामुळे प्रवेशाला उशिर अनेकदा पहिल्या टप्यात अनेकांना पसंतीचे महाविद्यालय मिळत नाही तरीही विद्यार्थी प्रवेश घेतात. नंतरच्या फेरीत अनेकांना कमी टक्केवारी असूनही चांगले महाविद्यालय मिळते.
सप्टेंबर महिना संपत आला तरीही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया चालूच आहे. अनेक महाविद्यालयांतील अकरावीच्या प्रथम चाचणी परीक्षा संपल्या आहेत. त्यामुळे या उशिरा प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे संपूर्ण प्रवेश प्रक्रिया तीस दिवसांच्या आत संपेल, अशी कार्यवाही करण्याची गरज आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांचे नुकसान टाळाता येईल.मुकुंद आंधळकर, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ