मुंबई ः अकरावी प्रवेशात ज्या विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश मिळालेला नाही किंवा ज्यांना मिळालेल्या प्रवेशात बदल करायचा आहे अशांना आता चार फेर्यांनंतर ‘सर्वांसाठी खुला प्रवेश’ (ओपन फॉर ऑल) फेरी होणार आहे. या फेरीत, ज्या महाविद्यालयांत जागा रिक्त असतील अशा महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची संधी मिळणार आहे. याचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली.
अकरावी प्रवेशाच्या राज्यभरात चार फेर्या झाल्या तरी अजूनही लाखो विद्यार्थी प्रवेशापासून दूर आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्याला हवे ते महाविद्यालय मिळावे यासाठी पसंतिक्रम काही ठराविक महाविद्यालयांचे दिल्याने अनेक विद्यार्थी अजूनही प्रवेशापासून वंचित राहिले आहेत.
आता या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशात त्यांच्या गुणांनुसार महाविद्यालय निवडण्याची मुभा दिली जाणार आहे. चार फेर्यांनंतर ’सर्वांसाठी खुला प्रवेश’ (ओपन फॉर ऑल) नावाची विशेष फेरी जाहीर करण्यात येणार असून, महाविद्यालयातील रिक्त जागांवर त्या माध्यमातून प्रवेश मिळणार आहे.
मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील अकरावी ऑनलाईन प्रवेशांत पहिल्या फेरीत ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांना आता होणार्या या फेरीत जर अकरावीला प्रवेश हवा असल्यास शिल्लक जागांचा योग्य ताळमेळ लक्षात घेऊन प्रवेशासाठी महाविद्यालयांचे पसंतिक्रम भरले तरच यादीत प्रवेश मिळण्याची शक्यता आहे.
अजूनही मुंबई विभागात 50 हजार विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. कमी गुण मिळालेला विद्यार्थीही नामवंत महाविद्यालयांची आशा बाळगतो. यामुळे प्रवेश न मिळाल्याच्या तक्रारी आहेत. आता होत असलेल्या फेरीत विद्यार्थ्यांना आपला पसंतिक्रम हा योग्य तो द्यावा अन्यथा याही फेरीतून प्रवेशापासून दूर राहण्याची शक्यता आहे.
मुंबई विभागात 4 लाखांहून अधिक जागा असल्या तरी शुक्रवार सायंकाळपर्यत चौथ्या फेरीच्या अंतिम टप्प्यापर्यंत मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांत विविध कोट्यातून 43 हजार 901 विद्यार्थ्यांनी तर कॅप फेरीतून 1 लाख 46 हजार 890 विद्यार्थ्यानी असे 1 लाख 90 हजार 791 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेश घेतले आहेत. चौथ्या फेरीचा आज (2 ऑगस्ट) शेवटचा दिवस आहे. यानंतर आता रिक्त जागांची माहिती 4 ऑगस्टला सायंकाळी 4 वाजता जाहीर होणार आहे.
प्रवेशाच्या चार फेरी पूर्ण झाल्या आहेत. आता प्रवेशासाठी शिल्लक असलेल्या विद्यार्थ्याना ओपन टू ऑल फेरी असणार आहे. या फेरीचे वेळापत्रक दोन दिवसात जाहीर केले जाणार आहे. या वेळापत्रकानुसार प्रवेश घेण्यासाठी प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना कार्यवाही करावी लागणार आहे.डॉ. महेश पालकर, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक,
कॅप फेरीतून प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या : 2,89,124
प्रवेश घेतलेले विद्यार्थी : 1,46,890
कोट्यातून दिलेले प्रवेश : 44,454
घेतलेले प्रवेश : 43,901