Future Retail SBI Fraud | फ्युचर रिटेलचा स्टेट बँक ऑफ इंडियाला ९०४ कोटींचा गंडा 
मुंबई

Future Retail SBI Fraud | फ्युचर रिटेलचा स्टेट बँक ऑफ इंडियाला ९०४ कोटींचा गंडा

किशोर बियाणी, राकेश बियाणींविरोधात सीबीआयचा गुन्हा; मुंबईतील अनेक ठिकाणांवर छापे

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : देशातील नामांकित रिटेल व्यवसाय समूह असलेल्या फ्युचर रिटेल लिमिटेड कंपनीविरोधात ९०४.३२ कोटी रुपयांच्या बँक फसवणूकप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे कंपनीचे प्रवर्तक किशोर बियाणी, राकेश बियाणी यांच्यासह कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक, कार्यकारी संचालक, हमीदार, अज्ञात सरकारी अधिकारी आणि अन्य व्यक्तींविरोधात हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी मुंबईतील विविध ठिकाणी सीबीआयने छापे टाकून तपासाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली. एसबीआयच्या मुंबईतील स्ट्रेस्ड ॲसेट्स मॅनेजमेंट शाखा-३ यांनी यासंदर्भात सीबीआयकडे तक्रार केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. बँकेची ९०४.३२ कोटी रुपयांची कथित आर्थिक हानी झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

फसवणूक करण्यासाठी कट रचणे, बँकेची दिशाभूल करणे तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींनुसारही गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. कंपनीने या कर्जसुविधा घेताना निश्चित केलेल्या अटी आणि उद्देशानुसार निधीचा वापर करणे अपेक्षित होते. मात्र, बँकेकडून मंजूर करण्यात आलेला निधी ज्या कारणासाठी देण्यात आला होता, त्या कारणासाठी त्याचा वापर करण्यात आला नसल्याचा आरोप आहे. कर्जाच्या रकमेचा अन्यत्र वापर करण्यात आल्याने बँकेची मोठी आर्थिक हानी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

संलग्न कंपन्यांकडे निधी वळवला?

फ्युचर रिटेल लिमिटेडने बँकेकडून मिळालेल्या निधीचा काही भाग आपल्या सहयोगी कंपन्या आणि संबंधित संस्थांकडे वळविल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. या कंपन्या आणि संबंधित संस्थांच्या माध्यमातून निधी वळवून बँकेची फसवणूक केल्याचा संशय आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT