राज्य सरकार हेल्पलाईन Pudhari File Photo
मुंबई

मुंबई : मुलींना मोफत शिक्षण योजना; राज्य सरकारने लाँच केली हेल्पलाईन

मुलींनो मोफत शिक्षण योजनेत अडचण येतेय? या नंबरवर साधा संपर्क; सरकारची हेल्पलाईन सुरू

पुढारी वृत्तसेवा

नवीन शैक्षणिक धोरणानुसार (NEP) व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढावे. तसेच मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने मुलींना व्यावसायिक उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. कौटुंबिक आणि आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता असलेल्या मुलींना या निर्णयामुळे निश्चितच मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

उच्च शिक्षण विभाग हेल्पलाईन

कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या पालकांच्या मुलींचे पदवी, पदविका तसेच पदव्युत्तर पदवीचे शिक्षण महाराष्ट्र सरकारकडून मोफत देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेताना विद्यार्थिनींना काही अडचणी आल्यास त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी उच्च शिक्षण विभागाने हेल्पलाईन क्रमांक आणि हेल्प डेस्क सुरू केला आहे. ही हेल्पलाईन 0796134440, 07969134441 या क्रमांकावर आणि helpdesk.maharashtracet.org यावर संपर्क करावा, ही हेल्पलाईन कार्यालयीन दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यत कार्यरत आहे. या हेल्पलाईनचा उपयोग करावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

100 टक्के मोफत शिक्षण

यासंदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, या योजनेसाठी https://mahadbt.maharashtra.gov. in पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करू शकतात. राज्यातील शासकीय महाविद्यालये, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालये, अंशत: अनुदानित (टप्पा अनुदान) व कायम विनाअनुदानित महाविद्यालये / तंत्रनिकेतने/सार्वजनिक विद्यापिठे, शासकीय अभिमत विद्यापीठे (खाजगी अभिमत विद्यापीठे/स्वयं अर्थ सहाय्यित विद्यापीठे वगळून) व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्याक्रमांना प्रवेश घेणाऱ्या मुलींना वार्षिक शैक्षणिक व परीक्षा शुल्क या योजनेद्वारे 100 टक्के मोफत करण्यात आले आहे.

शैक्षणिक वर्ष सन 2024-25 व त्यापूर्वी ज्या मुलींनी प्रवेश घेतलेला आहे, सध्या विविध शैक्षणिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या मुलींना अशा सर्व पात्र मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या विद्यार्थीनींनी प्रवेशासाठी पैसे भरले असतील त्यांना भरण्यात आलेले पैसे परत करण्यात येणार आहेत. त्यासाठी पात्र मुलींना रक्कम प्राप्त करुन घेण्यासाठी त्यांचे बॅंक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे गरजेचे आहे.

माहितीसाठी अधिक संपर्क

या योजनेचा अर्ज भरताना काही अडचण आल्यास संबधित महाविद्यालयाचे प्राचार्य/नोडल अधिकारी, विभागीय सहसंचालक कार्यालयातील नोडल अधिकारी किंवा महाआयटीच्या पोर्टलवरील Grieviance Section मध्ये नोंद करावी. या योजनेची माहिती महाडीबीटी पोर्टल https://mahadbt.maharashtra. gov.in, उच्च शिक्षण संचालनालयाचे संकेतस्थळ https://dhepune.gov.in , तंत्र शिक्षण संचालनालयाचे संकेतस्थळ https://www.dtemaharashtra.gov.in, कला संचालनालयाचे https://doa.maharashtra. gov.in या सर्व अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

मंजूर शिष्यवृत्ती सत्र निहाय दोन टप्प्यात बँक खात्यात जमा केली जाणार आहे. शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांपैकी केवळ कोणत्याही एकाच योजनेंतर्गत लाभ मिळण्यास संबंधित विद्यार्थीनी पात्र असणार आहे, असेही मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT