गणेश मूर्तिकारांसाठी पर्यावरणपूरक रंगही मोफत pudhari photo
मुंबई

Free eco-friendly paints for idol makers : गणेश मूर्तिकारांसाठी पर्यावरणपूरक रंगही मोफत

जलप्रदूषण टाळण्यासाठी मुंबई महापालिकेकडून १० हजार ८०० लिटर रंगाचे वाटप

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : शाडू मातीनंतर आता पर्यावरणपूरक गणेशमूर्तीसाठी मोफत रंगांचे वाटप करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सहा प्रकारच्या पर्यावरणपूरक रंगांचे वाटप करण्यात येणार असून १० हजार ८०० लिटर्स पर्यावरणपूरक रंग उपलब्ध करून दिला जाणार आहे.

मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्तीकडे वळावे यासाठी मुंबई महानगरपालिकेने मूर्तिकारांना मोफत शाडूच्या मातीसह आता रंगही मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेकडून मूर्तिकारांना मोफत शाडू माती, 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर देण्यात आली असून मंडपाकरीता जागा व अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आता सहा पर्यावरणपूरक रंग उपलब्ध केले जाणार आहेत. यात ७ हजार ८०० लिटर्स रंग आणि ३ हजार लिटर्स इको प्रायमर पुरविण्यात येणार आहे.

मूर्तिकारांना प्रायोगिक तत्त्वावर पांढरा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा आणि लाल असे सहा पर्यावरणपूरक रंग पुरविण्यात येणार आहेत. यामध्ये अन्य रंगांच्या तुलनेत पांढरा रंग मोठ्या प्रमाणात पुरविण्यात येणार आहे. यासोबतच पर्यावरणपूरक पांढरा प्रायमरही देण्यात येणार आहे. मूर्तिकारांनी आपापल्या परिसरातील प्रशासकीय विभाग कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन महापालिका उप आयुक्त, श्री गणेशोत्सवाचे समन्वयक प्रशांत सपकाळे यांनी केले आहे.

९५२ टन मातीचे वाटप

मूर्तिकारांना दरवर्षीप्रमाणे यंदाही मोफत शाडू माती पुरविण्यात आली आहे. आतापर्यंत ९५२ टन माती पुरविण्यात आली आहे. यासोबतच ९९७मूर्तिकारांना मूर्ती घडविण्यासाठी मंडपासाठी जागाही देण्यात आल्याचे पालिकेकडून सांगितले.

पर्यावरणपूरक रंगांचाच वापर करावा

मूर्ती रंगविण्यासाठी वापरले जाणारे रंग रासायनिक असल्यामुळे ते पर्यावरणासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे विसर्जनाच्या वेळी जलस्रोतांचे प्रदूषण होऊन सार्वजनिक आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतात. त्यामुळे शक्य तितक्या पर्यावरणपूरक रंगांचाच वापर करावा, व जलाशयांचे प्रदूषण टाळावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT