मुंबई : राज्यातील सात जिल्ह्यांत सरकारी रुग्णालयांत एमआरआय सेवा सुरू करण्यात येत असून कोल्हापूर, सातारा, सोलापूरसह ११ जिल्ह्यांमध्ये डायलिसीस सेवांचा विस्तार करण्यात येत आहे. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी या सेवांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या सेवांमुळे ग्रामीण व दुर्गम भागातील रुग्णांना अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध होणार आहे.
प्रधानमंत्री राष्ट्रीय डायलिसीस कार्यक्रमाअंतर्गत डायलिसीस सेवा पुरविण्यात येत आहे. यामध्ये कोल्हापूर, यवतमाळ, बीड, नाशिक, जळगाव, सोलापूर, सातारा, सिंधुदुर्ग, ठाणे, गडचिरोली आणि रत्नागिरी या ११ जिल्ह्यांतील ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये डायलिसीस सेवा सुरू करण्यात येत आहे. राज्यातील ९२ आरोग्य संस्थांमध्ये सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर डायलिसीस सेवा यापूर्वीच सुरू करण्यात आली असून ही सेवा पूर्णपणे नि:शुल्क आहे.
याबरोबरच भंडारा, बुलढाणा, अमरावती, नांदेड, धाराशिव, हिंगोली आणि परभणी या सात जिल्ह्यांतील शासकीय रुग्णालयांमध्ये २४ तास मोफत एमआरआय सेवा उपलब्ध राहणार आहे. यासाठी आवश्यक टेक्निशियन व रेडिओलॉजिस्ट, हे सेवापुरवठादारा मार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
डायलिसीस केंद्रे
कोल्हापूर (मुरगूड), यवतमाळ (दारव्हा), बीड (केज), नाशिक (इगतपुरी), जळगाव (रावेर), सोलापूर (मंगळवेढा), सातारा (ढेबेवाडी), सिंधुदुर्ग (वेंगुर्ला), ठाणे (बदलापूर), गडचिरोली (कुरखेडा), रत्नागिरी (दापोली).