मुंबई : क्रेडिटवर घेतलेल्या 5 कोटी 36 लाख रुपयांच्या अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी तीन हिरे व्यापार्याविरुद्ध बीकेसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आशिष जयवंत सोनी, जयवंत सोनी आणि चितन अरविंद सोनी अशी या तिघांची नावे आहेत. ते तिघेही अमेरिकेतील हिरे व्यापारी असून त्यांची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे.
46 वर्षांचे तक्रारदार हिरे व्यापारी असून त्यांचा बीकेसी येथे हिरे खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. भारतासह विदेशात ते हिर्यांची विक्री करत असून काही व्यापार्यांना क्रेडिटवर हिरे देतात. एका दलालामार्फत त्यांची अमेरिकेतील हिरे व्यापारी आशिष सोनी, जयवंत सोनी आणि चिंतन सोनी यांच्याशी ओळख झाली होती. ते तिघेही हिरे व्यापारी असून त्यांची अमेरिकेतील शिकागो शहरात हिरे खरेदी-विक्रीचा व्यवसाय होता. त्यांनी त्यांच्यासोबत हिर्यांचा खरेदी-विक्रीचा व्यवहार सुरु केला होता. सुरुवातीला क्रेडिटवर घेतलेल्या हिर्यांचे पेमेंट वेळेवर करुन या तिघांनी त्यांचा विश्वास संपादन केला होता. सप्टेंबर 2022 ते जुलै 2023 या कालावधीत त्यांच्याकडून या तिघांनी सुमारे साडेअठरा कोटी रुपयांचे हिरे घेतले होते. त्यापैकी काही रक्कम आणि हिरे त्यांनी त्यांना परत केले. मात्र उर्वरित 5 कोटी 36 लाख रुपयांचे हिरे परत केले नाही किंवा त्याचे पेमेंट दिले नाही.
वारंवार विचारणा करुनही त्यांनी हिरे किंवा पेमेंट केले नव्हते. या तिघांकडून फसवणुक होत असल्याचे लक्षात येताच तक्रारदार हिरे व्यापार्यांनी बीकेसी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आशिष सोनी, जयवंत सोनी आणि चिंतन सोनी या तिघांविरुद्ध पोलिसांनी हिर्यांचा अपहार करुन तक्रारदार हिरे व्यापार्याची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.