भीषण अपघातात फॉर्च्युनरचा चक्काचूर झाला.  
मुंबई

Fortuner Accident | मिसिंग लिंक बोगद्यात १६० च्या स्पीडने निघालेल्या फॉर्च्युनरची टेम्पोला धडक

अपघातात पुण्याच्या तरुणाचा जागीच मृत्यू; थरार सीसीटीव्हीमध्ये कैद

पुढारी वृत्तसेवा

खोपोली : मुंबई-पुणे एक्‍स्‍प्रेस-वेवरील मिसिंग लिंक बोगद्यात १६० च्या स्पीडने निघालेल्या फॉर्च्युनरने पिकअप टेम्पोला धडक दिल्याच्‍या अपघाताचा थरार शुक्रवारी मध्यरात्री घडला आहे. या अपघातात तुषार भूमकर (रा. वाकड, पुणे) यांचा मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तुषार भूमकर आपल्या मित्रांबरोबर मुंबईत मरीन ड्राईव्ह येथे रात्रीच्या वेळी जात असताना मिसिंग लिंगवर फॉर्च्युनर कारचे वेगावरील नियंत्रण सुटले असता समोरील मालवाहू टेम्पोला जोरदार धडक दिली. फॉर्च्युनरची धडक इतकी जोरात होती की, फॉर्च्युनरचा चक्काचूर झाला. अपघातात भूमकर यांचा मृत्यू झाला असून, एकजण गंभीर जखमी, तर तीन जखमी झाले आहेत.

बोगद्यात बचाव यंत्रणा वेळेवर पोहोचली नसल्यामुळे तब्बल दोन तास वाहतूक बंद ठेवत जुन्या महामार्गावरून वळविण्यात आली. महामार्ग पोलिस, आयआरबी पथक देवदूत आणि मदत यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले. मिसिंग लिंकच्या उद्‌घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यावश्यक सेवासुविधा बोगद्यात उपलब्ध करून दिली अशी माहिती दिली होती; परंतु बोगद्यात मोबाईल सेवा नसल्यामुळे अशा अपघातांमुळे अपघातग्रस्तांना संपर्क करणे शक्य होत नसून, मिसिंग लिंकच्या बोगद्यातील सुरक्षा आता ऐरणीवर आली आहे.

हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम कार्यान्वित करणार

शुक्रवारी रात्री मिसिंग लिंक बोगद्यात झालेल्या अपघातातील कार ८० कि.मी. प्रतितास वेग मर्यादेच्या क्षेत्रात १६० कि.मी. प्रतितास वेगाने जात होती, हे सीसीटीव्ही कॅमेर्‍यातून स्पष्ट झाले आहे. त्याच वेगात गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पुढील वाहनावर कार आदळून हा अपघात झाला आहे. हे अपघात टाळण्याकरिता एमएसआरडीसीच्या माध्यमातून हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (एचटीएमएस) तयार करण्यात आली असून, ती येत्या महिनाभरात कार्यान्वित होईल, असे एमएसआरडीसीचे मुख्य कार्यकारी अभियंता राहुल वसईकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT