Mumbai FDA Action pudhari photo
मुंबई

Sodexo License Suspended: मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयातील सोडेक्सोचा परवाना निलंबित; किचनमध्ये झुरळे आढळली

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; ड्रेनेजमध्ये अन्नकचरा, बुरशीयुक्त डबे आणि गंजलेले चाकू आढळले

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: रुग्णांसाठी अन्न तयार होणाऱ्या मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयातील सोडेक्सोच्या किचनमध्ये झुरळे, ड्रेनेजमध्ये अन्नकचरा, बुरशीयुक्त अन्नवाहतूक डबे आणि गंजलेले चाकू आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सोडेक्सो इंडिया सर्व्हिसेस प्रा. लि.चा परवाना निलंबित केला आहे.

मुंबईतील हॉटेल, बेकरी, कॅन्टीन आणि अन्य अन्न आस्थापनांच्या तपासणीत गंभीर त्रुटी आढळल्याने एकूण सात आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

अन्न सुरक्षा व मानके (अन्न व्यावसायिकांचा परवाना व नोंदणी) विनियम, २०११ मधील परिशिष्ट-४चे उल्लंघन झाल्याने ही कारवाई करण्यात आली. संबंधित आस्थापनांमध्ये स्वच्छता, अन्न हाताळणी आणि सुरक्षिततेच्या नियमांचे पालन होते की नाही, याची तपासणी करण्यात आली.

जनता बेकरीला ८८ पैकी २८ गुण

जोगेश्वरी पूर्व येथील जनता बेकरीच्या तपासणीत ८८ पैकी केवळ २८ गुण मिळाले. म्हणजेच बेकरीला अवघे ३२ टक्के गुण मिळाले. घाटकोपर पूर्व येथील अरिहंत आहार (ओनिक्स) या आस्थापनांत मिठाईत अनधिकृत कृत्रिम खाद्यरंग वापरल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर तपासणी करण्यात आली.

बोरिवली पूर्व येथील मनमंदिर स्वीट्समध्ये नोंदणी प्रमाणपत्रावर नमूद केलेल्या पत्त्याऐवजी अन्य ठिकाणी मिठाईचे उत्पादन केले जात असल्याचे आढळले. याशिवाय माशांचा प्रादुर्भाव, अस्वच्छ भांडी, कामगारांकडे वैद्यकीय प्रमाणपत्रांचा अभाव आणि उत्पादनस्थळीच कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या आस्थापनाला व्यवसाय बंद करण्याची नोटीस देण्यात आली आहे.

सात आस्थापनांवर कारवाई

मुंबई बाईट्स (गिरगाव), सोफिया कॉलेज कॅन्टीन (भुलाभाई देसाई रोड), ॲव्हेन्यू ई-कॉमर्स (सायन), जनता बेकरी (जोगेश्वरी पूर्व), पीएसएन सप्लाय चेन सोल्युशन्स, सोडेक्सो इंडिया सर्व्हिसेस (फोर्टिस रुग्णालय, मुलुंड)व अरिहंत आहार (ओनिक्स, घाटकोपर पूर्व) यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

अन्न व औषध प्रशासनाने राज्यभरात अन्न आस्थापनांच्या तपासणीची मोहीम तीव्र केली आहे. अन्नपदार्थांचा दर्जा व सुरक्षिततेबाबत तडजोड करणाऱ्या व्यावसायिकांवर कठोर कारवाई करणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ठाण्यात खाद्यतेल नष्ट

ठाण्यातील दहिसर मोरी येथील जीपीएस ऑईल इंडस्ट्रीजमधील रिफाइंड सोयाबीन तेल आणि मोहरीचे तेल निकृष्ट दर्जाच्या संशयावरून नष्ट करण्यात आले. या तेलाची किंमत १ लाख ६४,४०० रुपये आहे.

याशिवाय नेरळ (जि. रायगड) येथे जळाराम ट्रेडर्समधून कच्ची घाणी मोहरी तेलाच्या ११ बॉक्समधील १३२ बाटल्या जप्त करण्यात आल्या. या साठ्याची किंमत २८,७७६ रुपये आहे. जप्त केलेल्या अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत.

कारणे दाखवा नोटीस

मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या प्रादेशिक रक्तकेंद्रातील त्रुटींची एफडीएने गंभीर दखल घेतली आहे. या रक्तकेंद्राच्या तपासणीत दोष आढळल्यावर प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ‘आपले सरकार’ पोर्टलवर दाखल तक्रारीच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात पुढील कारवाई काय होणार, याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, तपासणीवेळी तांत्रिक पर्यवेक्षक अनुपस्थित असल्याच्या मुद्द्यावर तसेच थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना रक्तपुरवठा करण्याबाबत रुग्णालय प्रशासनाने यापूर्वी स्पष्टीकरण दिले होते.

रुग्णालयातील पूर्वीच्या तांत्रिक पर्यवेक्षकाची बदली झाली होती. त्यानंतर १५ ऑगस्ट २०२६ रोजी नवीन तांत्रिक पर्यवेक्षक पदाला मान्यता मिळेपर्यंतच्या कालावधीचा अपवाद वगळता, थॅलेसेमिया रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासू नये, यासाठी विशेष काळजी घेतल्याचे रुग्णालयाने म्हटले होते.

ठाणे, नवी मुंबईत खाद्यतेल, सुकामेवा, फरसाण जप्त

निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ, चुकीचे लेबलिंग व स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासनाने ठाणे व नवी मुंबई परिसरात कारवाई केली. ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट परिसरातील दोन रेस्टॉरंटचे परवाने निलंबित करण्यात आले असून, नवी मुंबईतील वाशी एपीएमसी मार्केटमधून सुमारे २३ लाख रुपये किमतीचा सुकामेवा आणि महापे एमआयडीसीतून फरसाण जप्त करण्यात आले आहे.

ठाण्यातील बेली लाफ्स बिस्ट्रो अँड टॅप आणि अँथनीज कॅफे अँड बेकरी या आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले. अन्नपदार्थांची हाताळणी, स्वच्छता व सुरक्षिततेच्या नियमांचे पालन होते की नाही, याची तपासणी करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT